अत्याचारास विरोधामुळेच खून
By admin | Published: October 5, 2016 02:45 AM2016-10-05T02:45:52+5:302016-10-05T02:45:52+5:30
लैेंगिक अत्याचाराला विरोध केल्यानेच कोपरी आनंदनगर येथील राखी शेजवळ (३०) या विवाहितेचा तिच्याच शेजारी राहणाऱ्या बाबू गोपाल गोगावले (२१) या तरुणाने खून केल्याचे उघड झाले आहे.
ठाणे : लैेंगिक अत्याचाराला विरोध केल्यानेच कोपरी आनंदनगर येथील राखी शेजवळ (३०) या विवाहितेचा तिच्याच शेजारी राहणाऱ्या बाबू गोपाल गोगावले (२१) या तरुणाने खून केल्याचे उघड झाले आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचने अवघ्या ४८ तासांमध्ये या हत्येचा छडा लावून त्याला अटक केली.
राखी ही विवाहिता असूनही गेल्या सहा महिन्यांपासून बाबू तिच्या मागे लागला होता. काही दिवसांपूर्वीही त्याने तिची अशीच छेड काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याच्या आईवडिलांनी त्याला घणसोलीतील त्याच्या बहिणीकडे पाठविले होते. कोपरीत आई, वडील आणि भाऊ वास्तव्याला असल्यामुळे तो अधून मधून त्यांना भेटण्याच्या निमित्ताने यायचा. २ आॅक्टोंबरला दुपारी ती कामगार कल्याण केंद्रासमोरील घरात पाणी भरण्यासाठी शिरल्यानंतर तिच्या पाळतीवर असलेला बाबूही तिच्या मागोमाग घरात शिरला. त्यावेळी त्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करीत लगट करण्याचा प्रयत्न केला. तिने त्याचा हा प्रयत्न धुडकावल्याने आधीच तयारीने आलेल्या बाबूने तिच्या गळ्यावर चाकूने वार केले. यात ती तडफडत मरण पावल्याचे पाहिल्यानंतरच तिथून पळ काढल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. दरम्यान, जय (६) आणि पारस (५) ही तिची दोन्ही मुले आजीच्या घरुन आंघोळ करुन परतली. तेंव्हा, आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली त्यांना दिसली. त्यानंतर हा प्रकार उघड झाला. घटनास्थळी सापडलेला चाकू आणि आणि शेजाऱ्यांच्या चौकशीतून तिच्या शेजारी राहणारा बाबू हा त्यादिवशी घरीच होता, असेही तपासात उघड झाले. पोलीस पथकाने आजूबाजूच्या दहा ते १२ जणांची चौकशी केली. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालातही तिने जोरदार प्रतिकार केल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. त्याचवेळी शेजारील बाबू हा वेगवेगळी उत्तरे देत असल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने अतिप्रसंगाला प्रतिकार केल्यानंतर चाकूने गळ्यावर वार करुन तिचा खून केल्याची कबुली दिली.
तक्रार झाली असती तर...
घाटकोपरच्या एका चॉकलेट कंपनीत डिलिव्हरी बॉयचे काम बाबू गोगावले करतो. रेखा यांच्या घराशेजारीच तो राहतो. यापूर्वीही त्याने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला होता. त्याचवेळी पोलिसांत तक्रार दाखल झाली असती तर कदाचित त्याची तिला मारण्यापर्यत मजल गेली नसती.
प्रतिकाराने वाचा फुटली
गोगावलेने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिने त्याला जोरदार प्रतिकार केला. यात तिच्या बांगड्याही फुटल्या. तिने त्याला नखांनी ओरबाडले. त्याच्या अंगावरील ओरखड्यानेही या खूनाला वाचा फुटली.