आधी निरूत्साह... नंतर वाढला टक्का!

By admin | Published: May 25, 2017 12:15 AM2017-05-25T00:15:39+5:302017-05-25T00:15:39+5:30

गेल्या तीन दिवसांत वाढलेला उन्हाचा तडाखा, मे महिन्याच्या सुट्या आणि एकंदरीतच राजकीय वातावरणाबद्दल असलेला तिटकारा याचा परिणाम भिवंडीच्या मतदानावर दिवसभर दिसून आला

Blossom before ... the percentage increased later! | आधी निरूत्साह... नंतर वाढला टक्का!

आधी निरूत्साह... नंतर वाढला टक्का!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी/अनगाव/ठाणे : गेल्या तीन दिवसांत वाढलेला उन्हाचा तडाखा, मे महिन्याच्या सुट्या आणि एकंदरीतच राजकीय वातावरणाबद्दल असलेला तिटकारा याचा परिणाम भिवंडीच्या मतदानावर दिवसभर दिसून आला. मतदारांतील निरूत्साह, तरूणांनी फिरवलेली पाठ, कामगार आणि मुस्लिम वस्त्यांतील शुकशुकाटामुळे भिवंडीच्या मतदानाचा टक्का संध्याकाळपर्यंत घसरलेला होता. प्रचारावेळी असलेल्या नैराश्याचे प्रतिबिंब मतदानातही पडले. संध्याकाळनंतर मात्र उमेदवार, नेते आणि कार्यकर्त्यांनी धावपळ करत मतदारांना बाहेर काढले आणि टक्का वाढवला. गेल्यावेळेपेक्षा सहा टक्के मतदान अधिक झाल्याचा प्राथमिक अंदाज येताच सर्व पक्षांनी हे वाढीव मतदान आमच्यासाठी झाल्याचा दावा सुरू केला.
भिवंडीच्या ९० जागांसाठी हे मतदान झाले. त्याची मोजणी गुरूवारी होणार आहे.
मतदारांच्या दुबार नावांचा विषय मतदानापूर्वी गाजलेला असल्याने अशा नावांवर उमेदवारांचे, बूथ प्रमुखांचे खास लक्ष होते. पण दुबार मतदानाच्या तक्रारी आल्या नाहीत. धक्काबुक्की, तणाव, बाचाबाचीचे किरकोळ प्रकार वगळता तुलनेने शांततेत मतदान पार पडले आणि ५५ टक्के मतदारांनी हक्क बजावल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला.
प्रचारावेळीच मतदारांतील निरूत्साहाचे दर्शन घडले होते. तो निरूत्साह सकाळपासूनच मतदानात दिसून आला. उन्हाचा कडाका वाढण्यापूर्वी ज्येष्ठांनी, महिलांनी आजारी, अपंगांनी मतदान केले. पण टक्का अजिबात वाढत नव्हता. खास करून तरूण मतदारांनी पाठ फिरवल्याचे जागोजाग दिसून येत होते. दुपारी महिलांची संख्याही कमी होती. अनेक मतदारांच्या घरी स्लिपा न पोचल्याने मतदानाचा टक्का घसरल्याचा दावा उमेदवार, बूथवरील त्यांचे कार्यकर्ते करीत होते. मतदारांच्या जागृतीसाठी, मतदानाचा हक्क बजावावा, मतदानाचा टक्का वाढावा यासाठी अन्य पालिकांत जशी जागृती हाती घेण्यात आली होती, त्याचा अभाव भिवंडीत दिसून आला. त्याचाही परिणाम मतदानावर झाल्याचे दावे केले जाऊ लागले. ज्या मतदारांना नेहमीचे मतदानकेंद्र, बूथ ठावूक होता, ते वगळता उरलेले मतदार उतरलेच नाहीत. रावजीनगर, पद्मानगर, भंडारी कम्पाऊंड, अवचितपाडा, समदनगर, अशोकनगर, कोंबडपाडा, कामतघर नजराणा बाजारपेठ येथे रांगा दिसू लागल्या. दुपारपर्यंत पंचायत समिती कार्यालय, दांडेकरवाडी शाळा, रंगराव पवार विद्यालय, पद्मश्री अण्णासाहेब जाधव, चाचा नेहरू हिंदी स्कूल, बीएनएन कॉलेज येथे तर तुरळक मतदार पाहायला मिळत होते.


मुस्लिम महिला मदतनीस : मोमीन गर्ल्स स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या ठिकाणी शिक्षिकाच मदतनीस म्हणून काम करत होत्या. मतदारांना माहिती देत होत्या. या कामासाठी तब्बल २८ शिक्षिकांचा ग्रूप तयार केला होता. त्यांना दोन तासांच्या ड्यूट्या देण्यात आल्या होत्या. या शाळेतील आणखी सहा महिलांना समदिया स्कूल येथेही ड्यूटीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती लिपिक अदील मुन्शी यांनी दिली.

व्यापाऱ्यांशी बाचाबाची
मतदान वाढविण्यासाठी पोलिसांनी काही भागातील दुकाने बंद करण्यास दुकानदारांना भाग पाडले. त्यामुळे पोलीस आणि दुकानदारांमध्ये तुरळक प्रमाणात बाचाबाची झाली. निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत गस्त सुरू होती. केंद्रांवर गर्दी होऊ न देण्यावर पोलिसांनी भर दिला होता.
पाण्यासाठी खास व्यवस्था
मे महिना, त्यात उन्हाचा कडाका वाढल्याने प्रत्येक मतदानकेंद्राच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केलेली होती.

49टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत सहा टक्के मतदान अधिक झाल्याचा अंदाज आहे.

दुबार मतदारांची पाठ : मतदारयादीत दुबार नावे असलेल्या मतदारांना ओळख पटवूनच मतदान करण्याच्या सूचना आधी दिल्या होत्या. बोगस मतदार आढळल्यास फौजदारी कारवाईचे आदेश आयुक्त योगेश म्हसे यांनी केंद्रप्रमुखांना दिले होते. परिणामी, अशा मतदारांपैकी अनेकांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचा दावा करण्यात आला.
कामगार वस्त्यांतही शांतता : कामगार, झोपडपट्टी असलेल्या कोंबडपाडा, संगमपाडा, म्हाडा कॉलनी, भादवड टेमघर, शांतीनगर, नवीवस्ती, शास्त्रीनगर, पद्मानगर, कामतघर, फेणेपाडा, ताडाली या भागात दुपारपर्यंत निरूत्साह होता. उन्हामुळेही मतदार बाहेर पडले नव्हते. अखेर संध्याकाळनंतर तेथील टक्का वाढला.
गावी गेलेले मतदार परतले : भिवंडीत राहणारी काही मंडळी कामानिमित्त बाहेरगावी गेली होती. यामध्ये बीड, उस्मानाबाद, लातूर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिसा, झारखंड या भागांचा समावेश आहे. तेथून हजारो गेलेले मतदार मतदानांसाठी परतले असल्याचा अंदाज कार्यकर्त्यांनी वर्तवला.

गैरहजर राहणाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई!
भिवंडीच्या निवडणुकीच्या तयारीवेळी जवळपास चार हजार लोकांना प्रशिक्षण दिले होते. ते दोन टप्प्यात दिले गेले.
पण बुधवारी मतदानाच्या दिवशाी जवळपास १५० कर्मचारी गैरहजर राहिले. या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या जातील.
तसेच त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करण्याबाबत निवडणूक आयोगाकडे प्रस्तावही पाठविण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

Web Title: Blossom before ... the percentage increased later!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.