मीरा-भाईंदरमधील झाडांना रोषणाईचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 11:35 PM2019-06-06T23:35:22+5:302019-06-06T23:39:45+5:30
लोकप्रतिनिधींची डोळेझाक : पालिकेचे बेगडी वृक्षप्रेम उघड, प्रशासनाकडून नियमांचे उल्लंघन
मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेचे बेगडी वृक्ष व पर्यावरणप्रेम विविध प्रकारे सातत्याने उघड झाले आहे. शहरात अनेक महिन्यांपासून झाडांवर दुकानदारांनी खिळे ठोकून बेकायदा विद्युत रोषणाई केली आहे. मात्र, प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी याकडे डोळेझाक करत झाडांना धोका निर्माण करण्यास पाठबळ दिले आहे.
मीरा-भाईंदर महापालिका प्रशासनाने झाडांचे संरक्षण व जतन अधिनियमांसह उच्च न्यायालय तसेच हरित लवादांच्या दिलेल्या आदेशांचे सातत्याने उल्लंघन चालवले आहे. अनुभवी पात्रताधारक सदस्य वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये नसतानाही बेकायदा समितीचे कामकाज करून हजारो झाडांना तोडण्याची परवानगी देत झाडांची कत्तल केल्याच्या तक्रारी आहेत. त्यावर, पालिका आणि सरकारनेही ठोस कार्यवाहीच केलेली नाही.
विकासकामांच्या आड तसेच खाजगी जागांमधील झाडांना तोडताना अधिनियमासह न्यायालय व हरित लवादाच्या आदेशांना केराची टोपली दाखवली. अगदी ५० ते ६० वर्षे जुनी झाडेही कापण्यात आली. झाडांच्या लागवडीचे फोटो काढून वृक्ष आणि पर्यावरणाची काळजी घेत असल्याचा दावा पालिका आणि लोकप्रतिनिधींनी सातत्याने चालवला आहे. परंतु, रोपांना संरक्षक जाळ्या, पाणी नसल्याने ती मरून गेल्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत.
झाडांच्या सभोवताली काँक्रिट व डांबर मात्र अजूनही पूर्णपणे काढलेले नाही. झाडांवर खिळे ठोकून लावले जाणारे फलक, वस्तू टांगवणे यावरही पालिकेने ठोस कारवाई केलेली नाही. उलट, वृक्ष प्राधिकरण समितीने हिमाचल, केरळ, काश्मीर, दार्जिलिंग, देहरादून आदी पर्यटनस्थळी मात्र लाखोंची उधळपट्टी करत अभ्यासदौऱ्यांच्या नावाखाली सहली काढल्या आहेत. वर्षभर छाटणीच्या नावाखाली झाडांची मनमानी तोड करताना हरित लवादाचे आदेशही पायदळी तुडवले आहेत.
झाडांचे संरक्षण व संवर्धनाबद्दल महापालिकेची भूमिका बेगडी असतानाच शहरातील गल्लीबोळापासून मुख्य मार्गावरील अनेक दुकानदार, हॉटेल व बार व्यावसायिक आदींनी सर्रास झाडांचा वापर रोषणाईसाठी केला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी झाडांवर बेकायदा विद्युत तोरणे लावली आहेत. झाडांना या तोरणांचा विळखा घालण्यासाठी झाडांमध्ये खिळे ठोकले आहेत. झाडांना इजा होऊन त्यांना धोका निर्माण झाला आहे. झाडे कमकुवत होऊन त्यांचे आयुष्य कमी होण्याचा धोका आहे. नियमानुसार झाडांवर रोषणाई करणाऱ्यांवर गुन्हे दाखल तर सोडाच, तोरणे काढण्याची तसदीही पालिका घेत नाही.
आपण उद्यान विभागाच्या अधिकाºयांना झाडांवर रोषणाई करणाºयांविरोधात गुन्हे दाखल करून झाडे मोकळी करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित अधिकाºयांनी कारवाई केली नसल्यास त्याची माहिती घेऊन आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार निर्णय घेतला जाईल. - दीपक पुजारी, उपायुक्त
महापालिका आणि लोकप्रतिनिधींना झाडे, पर्यावरण, निसर्ग याचे सोयरसुतक नाही. केवळ वृक्षलागवड आणि पर्यावरणप्रेमाचा कांगावा करतात. झाडांचा विविध प्रकारे नाश करण्यात पालिकाच आघाडीवर आहे. याप्रकरणी गुन्हे दाखल करून बेजबाबदार अधिकाºयांना घरी बसवण्याची हिंमत आयुक्त व नेत्यांनी दाखवावी. - साहिल सुलतान पटेल, वृक्षप्रेमी