रेमडेसिविर इंजेक्शनवर पालिकेचा २ कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:51 AM2021-06-16T04:51:53+5:302021-06-16T04:51:53+5:30

ठाणे : कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी यापूर्वी आवश्यक असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या खरेदीपोटी ठाणे महापालिकेने तब्बल २ कोटी रुपये खर्च ...

BMC spends Rs 2 crore on remedicivir injection | रेमडेसिविर इंजेक्शनवर पालिकेचा २ कोटींचा खर्च

रेमडेसिविर इंजेक्शनवर पालिकेचा २ कोटींचा खर्च

Next

ठाणे : कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी यापूर्वी आवश्यक असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या खरेदीपोटी ठाणे महापालिकेने तब्बल २ कोटी रुपये खर्च केले आहेत. या दोन कोटींमधून १६ हजार इंजेक्शनची खरेदी करण्यात आली आहे. तीन पुरवठादारांच्या माध्यमातून तीन वेळा या इंजेक्शनची खरेदी करण्यात आली असून तीनही वेळेला खरेदी वेगवेगळ्या दराने करण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला असून, आधीच पालिकेच्या कोविडविषयक साहित्याच्या खरेदीबाबत संशय घेणारे नगरसेवक या खरेदीबाबत काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये रेमडेसिविर इंजेक्शनला मोठ्या प्रमाणात मागणी होती. हे इंजेक्शन मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची फरफट सुरू होती. अनेकांनी जास्त रक्कम देऊन या इंजेक्शनची खरेदी करण्याची तयारी दर्शवली होती. एका एका रुग्णाला ५ ते ६ इंजेक्शनची आवश्यकता त्यावेळी भासत होती. त्यामुळे इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाइकांची अक्षरशः तारांबळ उडाली होती. त्यावेळी ठाणे महापालिकेकडेदेखील रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे आहे त्या किमतींमध्ये रेमडेसिविर इंजेक्शनची खरेदी करण्याची तयारी पालिकेने दर्शवली. ठाणे महापालिकेची आरोग्य केंद्रे, रुग्णालये, दवाखाने, कोविड रुग्णालयांकरिता आवश्यक असणाऱ्या ३२७ बाबींकरिता १३ कोटींच्या खर्चाला पालिका आयुक्तांनी मान्यता दिली असून, या निधीमधून हा खर्च करण्यात आला आहे.

मे. सिप्ला लि.कडून प्रति इंजेक्शन १०२०. ३२ रुपये या दराने ५००० इंजेक्शनची खरेदी करण्यात आली आहे. यासाठी ५१ लाख पालिकेला खर्च करावे लागले. मे. डेल्फा ड्रग्स आणि फार्मा इंडिया तसेच मे. दीप इंटरप्रायजेस यांच्याशी वारंवार संपर्क करूनही इंजेक्शन उपलब्ध झाले नाही. त्यामुळे बृहन्मुंबई महापालिकेला पत्र देऊन ५०० इंजेक्शनची मागणी करण्यात आली होती. मात्र बृहन्मुंबई महापालिकेकडून केवळ १०० इंजेक्शन मिळाली असून प्रति इंजेक्शन १५६८ या दराने पालिकेने १७ लाख २४ हजार मोजले आहेत. मे. केडीला हेल्थकेअर या कंपनीकडून १२९६.९६ प्रति दराने १० हजार इंजेक्शनची खरेदी करण्यात आली असून यासाठी १ कोटी २९ लाख ६९ हजार ठाणे महापालिकेने खर्च केले आहेत. आता हे सर्व खर्चाचे प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी सादर केले आहेत.

Web Title: BMC spends Rs 2 crore on remedicivir injection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.