पालिकेचा २७ कोटींचा खर्च कचऱ्यात; प्रकल्प बारगळल्यात जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 01:20 AM2021-02-12T01:20:24+5:302021-02-12T01:20:38+5:30
सल्लागारासह इतर कामांचा खर्चही पाण्यात
ठाणे : डायघर येथील कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प राबविणे अशक्य असल्याचा साक्षात्कार महापालिकेला तब्बल १२ वर्षांनंतर झाला आहे. त्यामुळे हा प्रकल्प गुंडाळण्याची तयारी पालिकेने केली आहे. परंतु हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यासाठी करण्यात आलेला सुमारे २७ कोटींचा खर्चही आता पाण्यात जाण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प ठाणेकरांसाठी आदर्श ठरावा यासाठी सल्लागार नेमण्यात आला होता. एका कंपनीला या प्रकल्पाचा अभ्यास करण्याचे काम दिले होते. परंतु तो खर्चही आता कचऱ्यात जाण्याची शक्यता आहे.
शहरात निर्माण होणाऱ्या ९६३ मेट्रिक टन कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया होत नाही. तरीही ओला आणि सुका कचरा वेगळा करून देण्यासाठी ठाणेकरांवर दडपशाहीचे धोरण पालिका राबवीत आहे. पालिकेला हक्काचे डम्पिंग मिळू शकलेले नाही. त्यामुळे शहरातील कचरा दिवा येथील डम्पिंगवर टाकला जात आहे. शहराच्या विविध भागात छोटेमोठे प्रकल्प हाती घेतले असले तरी त्यातूनही पालिकेला काही खास असे करता आलेले नाही. डम्पिंगचा प्रश्न सुटत नसल्याने आणि कचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावणे शक्य नसल्याने पालिकेचा स्वच्छ शहरांच्या यादीतील क्रमांक घसरला आहे.
दरम्यान, शहरातील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी १२ वर्षांपूर्वी डायघर येथे कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. परंतु या प्रकल्पाला विरोध झाल्याने पालिकेला तो यशस्वी करता आला नाही. त्यानंतर या ठिकाणी कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प उभारण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार सर्व सोपस्कार करण्यात आले. या प्रकल्पालाही स्थानिकांचा विरोध होता. परंतु तो विरोध शांत करण्यात पालिकेला यश आले.
हा प्रकल्प सुरू करण्यासाठी पालिकेने ५ लाखांचा खर्च करून सल्लागाराची नियुक्ती केली. तसेच दुसऱ्या कंपनीला २० लाख देऊन याचा अभ्यास करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
या ठिकाणी जाण्यासाठी पालिकेने ४ पदरी रस्ता बांधला आहे. हा रस्ता डम्पिंगसोबत येथील गावातही जात आहे. त्यामुळे त्याचा गावकऱ्यांना काही अंशी फायदा आहे. यासाठी २० कोटींचा खर्च करण्यात आला होता. याशिवाय येथे संरक्षक भिंत बांधण्यासाठी ७ कोटींचा खर्च करण्यात आला होता.
हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी आतापर्यंत सुमारे २७ कोटींवर खर्च केल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. याठिकाणी वृक्ष लागवडही केली असून, त्यासाठी काही लाखांचा खर्च झाल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.