ठाणे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना बीएनएचएस देणार निसर्ग शिक्षण; ७ हजार विद्यार्थ्यांना बनविणार पर्यावरण साक्षर
By प्रज्ञा म्हात्रे | Published: October 31, 2023 12:18 PM2023-10-31T12:18:05+5:302023-10-31T12:18:16+5:30
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) सहकार्याने हा उपक्रम होत असून महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या शाळांमधील पाचवी ते दहावीत शिक्षण घेणाऱ्या सुमारे ७ हजार विद्यार्थ्यांना पर्यावरण साक्षर बनविण्यासाठी निसर्ग प्रशिक्षण उपक्रम यावर्षीपासून सूरू करण्यात आला आहे.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) सहकार्याने हा उपक्रम होत असून महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे.
या उपक्रमात, बीएनएचएसचे शिक्षण अधिकारी आणि समन्वयक पर्यावरण जागरुकता या विषयावर संवादात्मक आणि संकल्पनांवर आधारित सादरीकरण आयोजित करणार आहेत. पक्षी, फुलपाखरे, वनस्पती, आपल्या सभोवतालची जैवविविधता, प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण, स्वच्छ भारत अभियान, पर्यावरणपूरक जीवनशैली यांच्याबद्दलचे कार्यक्रम शाळांमध्ये पुढील वर्षभर आयोजित केले जाणार आहेत. त्याशिवाय, महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी संवर्धन शिक्षण केंद्र, ठाणे खाडी अशा वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यास दौऱ्यासाठी नेण्यात येईल. खाऱफुटी, वनस्पती, पक्षी यांच्याबद्दलच्या नोंदी करण्यास मार्गदर्शन केले जाणार आहे.
या उपक्रमामुळे, महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना निर्सग शिक्षण मिळेल, त्यातून पर्यावरण विषयक जागरुकता वाढेल. विद्यार्थ्यांना मुंबई-ठाण्यातील पर्यावरण, वने, वन्यजीव, जैवविविधता, त्यांच्या संवर्धनातील आपली भूमिका यांच्याबद्दल माहिती मिळेल. जास्तीत जास्त विद्यार्थी आणि शिक्षकांपर्यत हा उपक्रम पोहोचवून पर्यावरण साक्षरता वाढवण्यास मदत होणार आहे. ठाणे महापालिकेचा शिक्षण विभाग आणि बीएनएचएस यांच्यात निसर्ग शिक्षण उपक्रमासाठी करार झाला असून त्याची अमलबजावणीही सुरू झाली आहे. ठाणे महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना पर्यावरण शिक्षण देणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. वंचित समाजातील, निम्न आर्थिक स्तरातून येणाऱ्या या विद्यार्थ्यांना निसर्गाविषयी जाणून घेण्याची, जैवविविधता संवर्धनाचे महत्त्व समजून घेण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत ही संधी मोलाची ठरेल, असा विश्वास या उपक्रमाविषयी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला आहे.