बेघर मुलांसाठी मंडळाची निर्मिती व्हावी : सुसीबेन शहा
By प्रज्ञा म्हात्रे | Published: February 14, 2024 05:11 PM2024-02-14T17:11:48+5:302024-02-14T17:14:19+5:30
ठाणे: बेघर मुलांची समस्या सोडवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. मुंबई, पुणे अशी शहरे बेघर मुलांपासून मुक्त व्हायला हवीत यासाठी ...
ठाणे: बेघर मुलांची समस्या सोडवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. मुंबई, पुणे अशी शहरे बेघर मुलांपासून मुक्त व्हायला हवीत यासाठी आमचे प्रयत्न होत राहतील. इतर समुदाय आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो, परंतु मुलं ही व्हॉइस लेस असतात. त्यासाठी आपणच त्यांचा आवाज बनण्याची गरज आहे. बेघर मुलांसाठी मंडळाची निर्मिती व्हावी यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन याची राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुसीबेन शहा यांनी ग्वाही दिली
जनकवी पी. सावळाराम सभागृहात संपन्न झालेल्या चौथ्या सत्रात शहा बोलत होत्या. या सत्राचे अध्यक्ष ॲड.सुयश प्रधान होते. या सत्रात बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या नीलिमा चव्हाण आणि रिमांड होम डोंगरी येथील अधीक्षक रोहीत कंठीकर, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे माजी सदस्य संतोष शिंदे हे वक्ते सहभागी झाले होते. सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातील 'बिईंग मी समिती' व 'जीवन संवर्धन फाऊंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी "फ्रॉम स्ट्रगल टू स्ट्रेंथ: नेव्हिगेशन अँड नेटवर्किंग फॉर हॉमलेस चिल्ड्रेन" या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न झाली. पहिल्या सत्रात जीवन संवर्धन फाउंडेशनच्या डॉ.जयश्री कुलकर्णी यांनी बेघर मुले ही संकल्पना विस्ताराने विशद केली. या बेघर मुलांचा प्रश्न खूप गंभीर असून ही राष्ट्राच्या विकासात बाधा ठरत आहे.
यासाठी अश्या मुलांच्या आयुष्यात तिमिरातून तेजाकडे जाणारी वाट निर्माण करणे, हे आपले कर्तव्य आहे. अशी भूमिका मांडली. या राष्ट्रीय परिषदेमध्ये सादर केल्या जाणाऱ्या शोध निबंधांचा गोषवारा मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेश भगूरे यांनी महाविद्यालय स्तरावर शैक्षणिक कार्यासह राबवले जाणारे समाजाभिमुख कार्यक्रम, विद्यार्थी केंद्री उपक्रमात विद्यार्थ्यांचा ४०% सहभाग तसेच राष्ट्रीय स्तरावर चमकणारे महाविद्यालयाचे विद्यार्थी आदी बाबींचा आढावा घेतला. तिसऱ्या सत्राच्या अध्यक्ष डॉ.प्रज्ञा दया पवार यांनी जात, वर्ग व लिंगभेदातून आपण भनंगपणाकडे जात आहोत याचे एक उदाहरण म्हणजे आजची बेघर लोकांची वाढलेली संख्या असे अधोरेखित केले. डॉ. इंदूप्रकाश सिंग यांनी बेघरांवर कोणतेही संशोधन जेव्हा या विषयात आपण काम करायला सुरुवात केली तेव्हा उपलब्ध नव्हते त्यामुळे सरकारी कार्यक्रमातून जी कामे होत नाहीत त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत असे मत व्यक्त केले.