ठाण्यात आपदा मित्रांना तलावात ‘बोट’ चालवण्याचे धडे, पूरस्थितीपूर्व प्रशिक्षण
By सुरेश लोखंडे | Published: December 29, 2022 04:38 PM2022-12-29T16:38:46+5:302022-12-29T16:39:26+5:30
जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ठिकठिकाणच्या आपत्तीवर मात करण्यासाठी या आपदा मित्रांना विविध संकट कालावधीचे धड दिले जात आहे
ठाणे : जिल्ह्यातील नद्या, खाडी किनारे पावसाळ्यात आक्राळ विक्राळ रूप घेऊन वाहत असतात. या कालावधीत निर्माण होणाऱ्या जीवघेण्या पूर स्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आता आपदा मित्रांचे दोन पथक तयार केले आहेत. त्यातील तरूणांना आवश्यक ते प्रशिक्षण दिले जात आहे. याशिवाय आज येथील तलावपालीच्या तलावात त्यांना बोट चालवण्याचे, वल्हवण्याचे धडे आज तज्ञांकडून देण्यात आले आहेत. दोन सत्रात या तुक्यांना बोट चालवून आपत्तीवर मात करण्याचे धडे प्राप्त झाले आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ठिकठिकाणच्या आपत्तीवर मात करण्यासाठी या आपदा मित्रांना विविध संकट कालावधीचे धड दिले जात आहे. प्रशिक्षित होत असलेल्या या दोन्ही तुकड्यांमध्ये ११२ जणांचा समावेश आहे. म्हणजे प्रत्येक तुकडीत ५६ जणांचा समावेश आहे. त्यांना येथील तलावपालीच्या तलावात पूर स्थितीत बोट चालवण्याचे धडे देण्यात आले. दोन सत्रात या प्रशिक्षणार्थींना या बोट चालवण्याचे धडे देण्यात आल्याचे या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकारी अनिता जवंजाळ यांनी लोकमतला सांगितले. विविध स्वरूपाचे धडे घेत असलेल्या या पहिल्या तुकडीत राष्ट्रीय कॅडेट कोअर, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व आपत्ती व्यवस्थापन विषयक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या आधी या आपदा मित्रांना ‘आगीवर नियंत्रण’ मिळवण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षणही मिळाले आहे.
जिल्ह्यातून ५०० आपदा मित्र तयार करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. आपदा मित्र प्रात्यक्षिक, प्रशिक्षण वर्गाच्या पहिल्या तुकडीचे १२ दिवसांचे प्रशिक्षण ठाण्यातील व्ही.पीएम.केजी. जोशी कला महाविद्यालय आणि एन.जी. बेडेकर वाणिज्य महाविद्यालयात सुरु आहेत. निवासी उप जिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षणासह प्रात्यक्षिकांचा उपक्रम हाती घेतला आहे. ठाणे अग्निशमन दलाचे प्रमुख ओमकार वैती, भिवंडी अग्निशमन दलाचे प्रमुख नितीन चौहाण, कार्य अधिकारी नरेश भूवणे, सुहास पेडणेकर, ठाणे ग्रामीण पोलीसच्या महिला हवालदार भाग्यश्री सावंत आदी तज्ञ व अनुभविकांकडून या आपदा मित्रांना धडे मिळत आहे. या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील महाविद्यालयातील राष्ट्रीय कॅडेट कोअर (एन.सी.सी) आर्मी गर्ल्स, एन.सी.सी नेव्हल युनिट, राष्ट्रीय सेवा योजना व आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यपन करणारे विद्यार्थी यांनी सहभागी आहेत.