फलक लागले पण दिशा भरकटलेलीच, नियमांच्या अंमलबजावणीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 03:06 AM2018-06-21T03:06:27+5:302018-06-21T03:07:24+5:30
ठाकुर्लीतील पुलावर सोमवारी घडलेल्या अपघातानंतर जागे झालेल्या केडीएमसी प्रशासनाने मार्गदर्शक फलक तेथे लावले आहेत.
डोंबिवली : ठाकुर्लीतील पुलावर सोमवारी घडलेल्या अपघातानंतर जागे झालेल्या केडीएमसी प्रशासनाने मार्गदर्शक फलक तेथे लावले आहेत. परंतु पुलाच्या परिसरातील रस्त्यांवर फलक अद्याप न लावल्याने तेथे वाहतुककोंडीला चालकांना सामोरे जावे लागत आहे.
उड्डाणपूल चढत असताना थ्री व्हीलर टेम्पो कठड्याला धडकल्याची घटना नुकतीच घडली. या अपघातात कठडा तुटून टेम्पो खाली रूळांवर कोसळला असता, तर मोठा अनर्थ घडला असता. या घटनेमुळे उशिरा का होईना जाग आलेल्या केडीएमसी प्रशासनाने पुलावर वाहनचालकांसाठी मार्गदर्शक फलक लावले आहेत. ‘कृपया वाहने सावकाश चालवा,’ ‘वेग ताशी ३० कि. मी. ठेवा,’ ‘उड्डाणपुलावर ओव्हरटेक करू नका’ असे फलक लावले आहेत. परंतु, पुलाच्या परिसरातील काही मार्ग एकदिशा केले आहेत. तसेच काहीठिकाणी वाहने उभी करण्यासाठी ‘पी १’ आणि ‘पी २’ असे बदल सूचविले आहेत. महत्त्वाचे म्हणजे काही रस्त्यांवर वाहने उभी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. कानविंदे चौक, व्ही. पी. रोड, मंजूनाथ चौक, गुरूमंदिर रोड, छेडा रोड, छत्रपती संभाजी महाराज पथ या भागांमध्ये हे बदल सूचविण्यात आले आहेत. याबाबतचे दिशादर्शक फलक मात्र अद्यापपर्यंत लावलेले नाहीत. त्यामुळे सध्या येथे वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचे सकाळ-सायंकाळ पाहावयास मिळत आहे. या उड्डाणपुलावर अवजड वाहनांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. परंतु, बिनदिक्कतपणे या वाहनांची येजा सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे.
>मोठ्या अपघातानंतर जाग?
टेम्पोच्या अपघातानंतरही वाहतूक पोलिसांनी उड्डाणपुलाचे उद्घाटन न झाल्याचा मुद्दा उपस्थित करत वाहतुकीच्या नियोजनाकडे दुर्लक्ष केले आहे. एखादा मोठा अपघात घडल्यानंतर वाहतूक पोलिसांना जाग येणार का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पुलाच्या परिसरातील कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलीस आणि वॉर्डन नेमण्याची मागणी होत आहे.