बॉबी खून प्रकरण : आरोपींना अलाहाबादमध्ये पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 01:31 AM2017-11-13T01:31:09+5:302017-11-13T01:31:22+5:30
लोकमान्यनगर येथील तरसेम सिंग उर्फ बॉबी (२५) याचा खून करणार्या शिवम तिवारी, राहुल यादव आणि आकाश निशाद या तिघांनाही ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने थेट अलाहाबाद (उत्तर प्रदेश) येथून शनिवारी ताब्यात घेतले. त्यांची ट्रान्झिस्ट कस्टडी घेऊन ितघांनाही सोमवारी ठाण्यात आणले जाणार आहे.
जितेंद्र कालेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : लोकमान्यनगर येथील तरसेम सिंग उर्फ बॉबी (२५) याचा खून करणार्या शिवम तिवारी, राहुल यादव आणि आकाश निशाद या तिघांनाही ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने थेट अलाहाबाद (उत्तर प्रदेश) येथून शनिवारी ताब्यात घेतले. त्यांची ट्रान्झिस्ट कस्टडी घेऊन ितघांनाही सोमवारी ठाण्यात आणले जाणार आहे.
या खुनातील आरोपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी सावरकरनगर येथील रहिवाशांनी लोकमान्यनगर टीएमटी बस डेपो येथून शनिवारी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. तत्पूर्वी, या प्रकरणाच्या तपासासाठी वर्तकनगर पोलीस ठाण्याचे दोन, तर गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटचे एक अशा तीन पथकांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. तिघेही उत्तर प्रदेशात पळाल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने त्यांना ११ नोव्हेंबर रोजी अलाहाबाद रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले. त्यांना रविवारी अलाहाबाद न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याना ठाण्यात आणण्याची परवानगी ठाणे पोलिसांनी घेतली.
नावातील गोंधळामुळे खून..
तरसेम सिंग उर्फ बॉबी याच्या मैत्रिणीला शिवमने सांगितले की, तू बाबूबरोबर फिरत जाऊ नकोस. तिने बाबूऐवजी बॉबी ऐकले. शिवमने आपल्याला तुझ्याबरोबर फिरू नकोस, असे सांगितल्याचे तिने बॉबीला सांगितले. याचा जाब विचारण्यासाठी बॉबीने शिवमला बरेच कॉल केले.
अनेक मिसकॉल पाहिल्यानंतर शिवमने त्याला फोन केला. तेव्हा शिवमने त्याला सांगितले, मी बॉबी नाही तर बाबू म्हणालो. हवे तर मी तुला प्रत्यक्ष भेटून हे सांगतो. त्यानुसार, ते भेटले. शिवम काही मित्रांसह तसेच हत्यार बरोबर घेऊनच गेला होता. तेथे त्यांच्यात झालेल्या बाचाबाचीनंतर शिवमने थेट बॉबी आणि त्याचा साथीदार अजय सिंग याच्यावर छोट्या तलवारीने पोटावर वार केला. यात बॉबीचा मृत्यू झाला.