बॉबी खून प्रकरण: अखेर शिवमसह तिघांना पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 08:34 PM2017-11-15T20:34:34+5:302017-11-15T20:34:44+5:30
लोकमान्यनगर येथील तरसेम सिंग उर्फ बॉबी (२५) याचा खून करणाºया शिवम तिवारी, राहूल यादव आणि आकाश निशाद या तिघांनाही ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अलाहाबाद (उत्तरप्रदेश) येथून ताब्यात घेतल्यानंतर बुधवारी पहाटे वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.
ठाणे : लोकमान्यनगर येथील तरसेम सिंग उर्फ बॉबी (२५) याचा खून करणाºया शिवम तिवारी, राहूल यादव आणि आकाश निशाद या तिघांनाही ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अलाहाबाद (उत्तरप्रदेश) येथून ताब्यात घेतल्यानंतर बुधवारी पहाटे वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. तिघांनाही या खून प्रकरणात अटक केली असून त्यांना २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले.
सावरकरनगर येथील ज्ञानोदय शाळेच्या समोरच ६ नोव्हेंबर २०१७ रोजी बॉबीची क्षुल्लक कारणावरून शिवमसह तिघांनी चाकूने भोसकून हत्या केली होती. तर त्याचा साथीदार अजय सिंग याच्यावरही शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले होते. खून झाल्यानंतर पसार झालेले हे टोळके अलाहाबाद येथे असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे आणि हवालदार दिलीप शिंदे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बेंद्रे, हवालदार एस. सी. गोरे, नाईक राजेंद्र गायकवाड आणि दिलीप शिंदे आदींनी त्यांना ११ नोव्हेंबर रोजी अलाहाबाद रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले. त्यांना ‘ट्रान्झिस्ट कस्टडी’ (अलाहाबाद ते ठाणे दरम्यान प्रवासाची) देण्याची मागणी अलाहाबाद कनिष्ठ न्यायालयात १२ नोव्हेंबर रोजी करण्यात आली होती. या न्यायालयाने अलाहाबादच्या मुख्य न्यायालयाकडून ही अनुमती घेण्यास पोलिसांना आदेश दिले. तेंव्हा १५ नोव्हेंबरपर्यत ही ट्रान्झिस्ट कस्टडी अलाहाबाद मुख्य न्यायालयाने १३ नोव्हेंबर रोजी दिली. दोन दिवसांच्या प्रवासानंतर या तिघांनाही बुधवारी पहाटेच्या सुमारास वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ठाणे न्यायालयात त्यांना हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. वर्तकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. एस. तांबे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.