स्वॅब टेस्टिंगच्या ठिकाणीच ठेवले मृतदेह; ठाणेकरांत संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 01:45 AM2020-05-29T01:45:26+5:302020-05-29T01:45:33+5:30
कोव्हीडची तपासणी करण्यात येणाºया ठिकाणीच दोन मृतदेह उघड्यावर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ठाणे : मुंबईतील काही रुग्णालयात मृतदेह उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या बाजूला ठेवल्याचे प्रकरण ताजे असतांना आता ठाण्यातही असाच प्रकार समोर आला आहे. बाधितांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देऊन कोरोनाच्या संक्रमणाला कारणीभूत ठरलेल्या ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचा आणखी एक भोंगळ कारभार उघडकीस आला आहे.
कोव्हीडची तपासणी करण्यात येणाºया ठिकाणीच दोन मृतदेह उघड्यावर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. हे रुग्णालय सध्या कोव्हीड आणि नॉनकोविड अशा प्रकारात समाविष्ट केलेले आहे. या ठिकाणी कमी पैशंमध्ये कोव्हीड टेस्ट केली जात असल्याने मोठ्या संख्येने लोक चाचणीसाठी येत असतात. मात्र, ज्या ठिकाणी ही चाचणी करण्यात येते, त्याच ठिकाणी चक्क दोन अज्ञात मृतदेह ठेवल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या दोन पैकी एक मृतदेह हा स्ट्रेचरवर निळ्या प्लास्टिकमध्ये गुंडाळून ठेवला असून दुसरा पांढºया कापडात बांधून चक्क लादीवरच ठेवला असल्याचे सदर व्हिडीओत दिसत आहे.
एकीकडे मृतदेहांवरील अंत्यसंस्कारांसाठीही संहिता आखून दिलेली असताना हे दोन मृतदेह असे उघड्यावर टाकण्याचा प्रताप या रुग्णालय प्रशासनाने केला आहे. प्रशासनाने हे मृतदेह अज्ञात असल्याचे सांगितले आहे. त्यांना कोरोना नसल्याचे सांगितले जात असले तरी मृत्यूनंतर अनेकांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे हा प्रकार अनाकलनीय असल्याचे बोलले जात आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ दिशाभूल करणारा आहे. मृतदेह ठेवण्याची जागा जी निश्चित केलेली आहे, तिथेच मृतदेह ठेवले जात आहेत. मात्र, कामाच्या प्रचंड तणावामुळे मृतदेहांची विल्हेवाट लावण्यास कमीजास्त वेळ होऊ शकतो. याचाच गैरफायदा घेत कुणीतरी व्हिडीओ काढून खोडसाळपणा करण्याचा प्रयत्न केला.
- प्रतिभा सावंत, अधिष्ठाता, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा