कळवा रुग्णालय प्रशासनाचा आणखी एक भोंगळ कारभार मृत व्यक्तीचा अहवाल येण्याआधीच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 03:35 PM2020-05-04T15:35:01+5:302020-05-04T15:39:25+5:30
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय प्रशासनाच्या आणखी एका चुकीमुळे पालिका आणि पोलिसांची डोकेदुखी वाढणार आहे. मृत्यु झालेल्या रुग्णाचा मृतदेह कोरोना चाचणी अहवाल येण्यापुर्वीच घरच्यांच्या स्वाधीन केल्याची धक्कादायक माहिती पुन्हा एकदा समोर आली आहे.
ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचा आणखी एक भोंगळ कारभार समोर आला आहे. या रुग्णालयाने इंदिरा नगर भागातील हनुमान नगर येथील एका नागरीकाचा मृतदेह कोरोनाचा अहवाल येण्यापूर्वीच नातेवाईकांच्या स्वाधीन केला. त्यानंतर त्याच्या अंतयात्रेत अनेक नातेवाईक स्मशानभुमीत गर्दी करुन होते, गर्दी करु नका असे शासनाने सांगितले असतांनाही गर्दी झाल्याने पोलिसांनी येथील नागरीकांना मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु आता मृत्यु नंतर या ५० वर्षीय नागरीकाचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाची पुन्हा एकदा झोप उडाली आहे. त्याच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्यांबरोबर अंतयात्रेत सहभागी झालेल्यांची शोध मोहीम आता सुरु झाली आहे. एकूणच एकीकडे कोरोनाला थोपविण्यासाठी शासकीय पातळीवर तसेच पोलिसांकडून दिवस रात्र प्रयत्न सुरु असातांना दुसरीकडे रुग्णालय प्रशासनाकडून अशा पध्दतीने काम केले जात असल्याने कोरोनाला थोपवयाचे कसे असा सवाल आता उपस्थित झाला आहे.
हनुमान नगर भागातील एका व्यक्तीला हृदय विकाराचा झटका आल्याने त्याचा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु ३० एप्रिल रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. विशेष म्हणजे या कालावधीत त्याची कोरोना चाचणी देखील करण्यात आली होती. परंतु अहवाल येण्यापूर्वीच रुग्णालय प्रशासनाकडून त्याचा मृतदेह नातेवार्इंच्या स्वाधीन करण्यात आला. त्यानंतर त्याच्यावर रितसर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभुमीत गर्दी करु नका असे आदेश असतांनाही संबधींत मृत व्यक्तीच्या अंत्यदर्शनाला आणि अंत्यसंस्काराला अनेक जण सहभागी झाले होते. त्यामुळे पोलिसांनी येथील स्मशानभुमीतील नागरीकांना हाकलून लावले होते. दरम्यान आता मृत्यु नंतर रविवारी त्याचा कोरोनाचा अहवाल आला असून तो पॉझीटीव्ह आढळला आहे. त्यामुळे आता पालिका प्रशासनाची पूर्ती झोप उडाली आहे, रुग्णालय प्रशासनाच्या एका चुकीमुळे यापूर्वी लोकमान्य नगर भागात एका मृत झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. अवघ्या काही दिवसात येथील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ६० हून अधिक झाली आहे. त्यात आता रुग्णालय प्रशासनाच्या आणखी एका चुकीमुळे त्याचे भोग आता येथील नागरीकांबरोबर कोरोनाला थोपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालिका प्रशासनाबरोबर पोलिसांनाही भोगावे लागणार आहेत. त्यातही हे प्रकरण समोर येण्यापूर्वी रुग्णालय प्रशासनाकडून अशा प्रकारची आणखी एक चुक झाल्याची समोर आली आहे. नवीमुंबईतील दिघा भागातील एक व्यक्ती येथे उपचारासाठी दाखल झाली होती. परंतु तिचा मृत्यु झाला, त्यानंतर कोरोनाचा अहवाल येण्यापूर्वीच रुग्णालय प्रशासनाने मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला होता. त्यानंतर आता ही तिसरी चुक रुग्णालय प्रशासनाकडून झाली आहे. त्यामुळे याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित झाला आहे.
सदरचे प्रकरण अतिशय गंभीर असून या प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबधींतावर कारवाई झाली पाहिजे. पोलीस आणि पालिका प्रशासन कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र दुसरीकडे रुग्णालय प्रशासनाकडून अशा चुका होत असतील त्या पाठीशी घालणे अयोग्य आहे.
(नरेश म्हस्के - महापौर, ठामपा)