शॉकींग ! मृतदेह चक्क कचऱ्याच्या पिशवीत बांधला, रुग्णालय प्रशासनाकडून विटंबना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 07:45 PM2021-04-12T19:45:53+5:302021-04-12T19:46:16+5:30
रुग्णाच्या नातेवाईंकाचा संताप
ठाणे - शहरात मागील काही दिवसांपासून रेमडेसिवीर इंजेक्शनासोबतच ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असतांना आता मृतदेह बांधण्यासाठी देखील पालिकेकडे पीपीई कीट नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ग्लोबल रुग्णालयात दाखल असलेल्या एका रुग्णाचा मृतदहे चक्क कचऱ्याच्या प्लास्टीक पिशवीत बांधून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीन तास वाट बघूनही पीपीई कीट उपलब्ध न झाल्याने अखेर हा मृतदेह कचऱ्याच्या पिशवीत बांधावा लागल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकाने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
ठाणे महापालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यात आता मृत्युचा आकडाही चढा झाल्याचे दिसत आहे. मागील काही दिवसात रोजच्या रोज मृत्युचे प्रमाण वाढत आहे. एकट्या जवाहरबाग स्मशानभूमीत दोन दिवसापूर्वी ३५ हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यात आता मृतदेहांना बांधण्यासाठी पीपीई कीट उपलब्ध नसल्याची गंभीर बाब समोर आली. सोमवारी ग्लोबल रुग्णालयातून चार मृतदेह जवाहर बाग स्मशानभुमीत आणण्यात आले. त्यातील एक मृतदेह हा चक्क कचऱ्याच्या प्लास्टीक पिशवीत गुंडाळून आणण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
ग्लोबल रुग्णालयातून हे चार मृतदेह आणण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. परंतु, पीपीई कीट उपलब्ध न झाल्याने रुग्णालय प्रशासनाच्या वतीने हा मृतदेह चक्क कचऱ्याच्या पिशवीत बांधल्याचे समोर आले आहे. पीपीई कीट मृतदेह बांधला जावा, यासाठी रुग्णाचे नातेवाईक तीन तास ताटकळले होते. परंतु, तीन तासानंतरही ते उपलब्ध न झाल्याने अखेर रुग्णालय प्रशासनाकडून असा प्रकार करण्यात आला. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. एकूणच सध्या ठाण्यात रेमडेसिवीरचा, त्याचबरोबर ऑक्सीजनचा तुटवडा जाणवत असतांना आता मृतदेह बांधण्यासाठी देखील पालिकेकडे पीपीई कीट नसल्याचे समोर आले आहे. त्यातही स्मशानभुमीत किंवा शववाहिनीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे देखील पीपीई कीट नसल्याची बाब या निमित्ताने समोर आली आहे.