भाजपाची लगीनघाई : डोंबिवलीतील एकाच उद्यानाचे दोनदा झाले नामकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 06:16 AM2018-02-03T06:16:34+5:302018-02-03T06:16:57+5:30
डोंबिवली : पूर्वेकडील न्यू आयरे रोड, म्हात्रेनगर परिसरातील उद्यानाचे ‘भारतरत्न, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी उद्यान’ हे नामकरण वादाच्या भोवºयात सापडले आहे. भाजपाचे स्थानिक नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी मांडलेल्या या नामकरणाच्या ठरावाला महासभेत मान्यता मिळाली आहे. दरम्यान, आधीच या उद्यानाचे पांडुरंग दाजी मढवी व गणपत दाजी मढवी उद्यान असे नामकरण ठरावाद्वारे झालेले असताना भाजपाची ही लगीनघाई चर्चेचा विषय ठरली आहे. माजी नगरसेवक वसंत भोईर यांनी नामकरणाला हरकत घेतली असून त्यांनी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याकडे तक्रार केली आहे.
भोईर हे नगरसेवक असताना २०१५ आॅगस्टमध्ये पांडुरंग दाजी मढवी व गणपत दाजी मढवी असे नामकरण करण्याचा ठराव मंजूर झाला होता. उद्यानासाठी आरक्षित असलेली जागा ही मढवी यांची असल्याने त्यांच्या नामकरणाचा ठराव केल्याचे भगत यांचे म्हणणे आहे. परंतु, उद्यानाचे काम पूर्ण झाल्यानंतर सध्याचे नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी १५ डिसेंबरला झालेल्या महासभेत पुन्हा नव्याने माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या नावाने प्रस्ताव देऊन नामकरणाचा ठराव मंजूर करून घेतल्याकडे भगत यांनी लक्ष वेधले आहे.
२५ डिसेंबरला वाजपेयींच्या वाढदिवशी उद्यानाचे नामकरण करण्यात आले आहे. अटलबिहारी वाजपेयी हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांच्याबद्दल आमचा आक्षेप नाही. त्यांचे नाव अन्य कोणत्याही वास्तूला देता येईल. परंतु, ज्या स्थानिक नागरिकांची जमीन उद्यानासाठी आरक्षित केलेली आहे, त्यांचे नाव देण्याबाबत रीतसर ठराव केला असताना परस्पर नामकरण बदलण्याच्या निर्णयामुळे महासभेतील २०१५ च्या ठरावाचा अवमान झाला असल्याचे भगत यांचे म्हणणे आहे. ‘पांडुरंग दाजी मढवी व गणपत दाजी मढवी उद्यान’ असे नामकरण करून त्यांच्या कुटुंबीयांना आणि स्थानिक नागरिकांना न्याय मिळवून द्यावा, असे विनंतीपत्र भगत यांनी महापौरांना दिले आहे. याची प्रत आयुक्त पी. वेलरासू, विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांच्यासह अन्य पदाधिकाºयांनाही देण्यात
आली आहे.
योग्य ती कार्यवाही करा
भगत यांनी मुकुंद पेडणेकर यांच्या ठरावावर हरकत घेतल्यानंतर सचिव संजय जाधव यांनी शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांना पत्र पाठवून दोन्ही ठरावांच्या अनुषंगाने खातरजमा करून नामकरणाबाबत पुढील योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी विनंती केली आहे. या पत्राला नामकरण झालेल्या दोन्ही ठरावांच्या प्रती जोडण्यात आल्या आहेत.
तेव्हा उद्यान हस्तांतरित झाले नव्हते
संबंधित उद्यानाचे हस्तांतरण २०१७ ला झाले आहे. त्यामुळे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. २०१५ मध्ये ठराव झाला असलातरी त्यावेळी जागा ताब्यात नव्हती. त्यामुळे जागा हस्तांतर झाल्यानंतर आम्ही केलेला ठराव योग्य आहे. आपण आठ ते नऊ महिने अगोदरच नामकरणाचा प्रस्ताव दिला होता. ज्या मढवींची जागा घेतली आहे, त्याबाबत त्यांना महापालिकेने मोबदलाही दिला आहे, अशी प्रतिक्रिया नगरसेवक पेडणेकर यांनी दिली.