बोगस जामीन देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
By जितेंद्र कालेकर | Published: July 2, 2024 10:10 PM2024-07-02T22:10:36+5:302024-07-02T22:10:43+5:30
पगार पावत्या आणि रेशन कार्डही तयार केले बनावट
ठाणे: बनावट कागदपत्रे तयार करून त्या आधारे न्यायालयात बोगस जामीन देणाऱ्या टोळीचा ठाणेनगर पाेलिसांनी पर्दाफाश केला आहे. एका बलात्काराच्या गुन्ह्यातील आराेपीला अशाच प्रकारे बनावट कागदपत्रांच्या आधारे बाेगस जामीन दिल्याचे निदर्शनास आल्यानंतर ठाणेनगर पाेलिसांनी हुसेन वारसी अन्सारी (४६) याच्यासह पाच आराेपींना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पाेलिस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांनी मंगळवारी दिली.
वागळे इस्टेट पाेलिस ठाण्यात २०२३ मध्ये दाखल असलेल्या विनयभंग, मारहाण आणि बलात्काराच्या गुन्ह्यात रमेश यादव हा न्यायबंदी आहे. त्याच्याविरुद्ध ठाण्याचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यांच्या न्यायालयात रमेशने जामिनासाठी अर्ज केला हाेता. त्याच्या जामीनासाठी हुसेन अन्सारी याची जामिनाची बनावट कागदपत्रे तयार करून त्यास ठाणे न्यायालयात बोगस जामीनदार म्हणून हजर करण्यात आले. हा प्रकार पाेलिसांसह न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायदान विभागाचे कर्मचारी विनोद पाटील (४६) यांनी याप्रकरणी ठाणेनगर पाेलिस ठाण्यात फसवणुकीसह इतर कलमान्वये ३ जानेवारी राेजी गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिस उपायुक्त सुभाष बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पाेलिस निरीक्षक देशमुख यांच्या पथकाने तपासादरम्यान न्यायालयात बोगस जामीनदार म्हणून हजर झालेला हुसेन अन्सारी (४६) आणि त्याचा साथीदार इम्तियाज अहमद मेमन ऊर्फ चपट (४९) या दाेघांना १२ जून राेजी अटक केली. सखाेल चाैकशीमध्ये अस्लम नूर मोहम्मद मन्सुरी (५८), हॉप होरॉक्स अँड कम्युनिकेशनमधील मेहताब हैदर नसीम नकवी (४१) आणि त्याचा मेव्हणा मेहंदी हसन ऊर्फ आसिफ (२५) यांची नावे समाेर आली.
आसिफच्या मदतीने झेराॅक्स दुकानातील कॉम्प्युटरमध्ये अन्सारी वारसी याच्या नावाचे बनावट आधार कार्ड, इंटरनॅशल एअरकंडिशनर कंपनीचे ओळखपत्र, पगार पावत्या, रेशन कार्ड तयार करून ठाणे जिल्हा न्यायालयात जामीनदार एजंट म्हणून काम करणाऱ्या इम्तियाज अहमद मेमन ऊर्फ चपट (४९) यांच्या मदतीने वारसी याला न्यायालयात बोगस जामीनदार म्हणून हजर केले हाेते.