ड्रग्जच्या गुन्ह्यात बोगस जामीन, वकिलासह तिघांना अटक; ठाणे न्यायालयीन वर्तुळात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 08:42 AM2024-07-05T08:42:51+5:302024-07-05T08:43:09+5:30
एकच जामीनदार मुंबई, नवी मुंबईतही हजर केल्याचा आराेप
जितेंद्र कालेकर
ठाणे : पाच वर्षांपूर्वीच्या मुंबईतील ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात ठाणे दहशतवाद विरोधी पथकाने अटक केलेल्या आरोपीला बोगस जामीन प्रकरणात वकील आनंदप्रसाद सच्चिद्रनाथ उथ्थल (४४, रा. ऐरोली, नवी मुंबई) याला ठाणेनगर पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यामध्ये बोगस जामीन देणारा दलाल दीपक चौबे (२७, रा. मीरा रोड, ठाणे) आणि जामीनदार अनिल राजाराम कुरणे (३९, रा. मीरा रोड, ठाणे) यांनाही अटक केली. बनावट जामीनदार प्रकरणात एका वकिलास अटक झाल्याने ठाणे न्यायालयीन वर्तुळात एकच खळबळ उडाली.
ठाणेनगर पोलिसांनी चारच दिवसांपूर्वी ठाणे न्यायालयात बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस जामीनदार देणाऱ्या एका दलालासह पाच जणांच्या टोळीला अटक केली. अशाच प्रकारच्या अन्य एका प्रकरणातही ठाणेनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या ठाणे युनिटने २०१९ मध्ये मीराज शेख ऊर्फ साबूल विश्वास या ड्रग्ज तस्कराला पकडले होते तेव्हापासून न्यायालयीन कोठडीत असल्याने मीराज याने २६ मार्च २०२४ रोजी जामिनासाठी अर्ज केला.
पडताळणीदरम्यान पाेलखाेल
मुंबई उच्च न्यायालयात एक लाखाच्या वैयक्तिक जामिनावर त्याची सुटका होणार होती. त्याच्या कागदपत्रांची पडताळणी ठाणे न्यायालयात झाली. त्यात त्याने अनिल कुरणे आणि एक महिला अशा दोघांना जामीनदार म्हणून उभे केले होते. कुरणेसह दोघांनाही दीपक चौबे या दलालाने आणले होते. त्यावेळी ठाण्याचे जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. आर. देशपांडे यांनी त्याच्या कागदपत्रांची पडताळणीचे आदेश ठाणे एटीएसला दिले. परंतु, दोघांचीही कागदपत्रे बनावट असल्याने ठाणे एटीएसने ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार कुरणेला ११ मे २०२४ रोजी तर यातील दलाल चौबेला १६ मे रोजी अटक झाली.
असा झाला व्यवहार
या संपूर्ण तपासात कुरणेच्या कागदपत्रांची पडताळणी आनंदप्रसाद उथ्थल या वकिलाने केल्याची बाब उघड झाली. शिवाय, ॲड. उथ्थल यांनीच कुरणे याला मुंबई आणि नवी मुंबईतही जामीनदार म्हणून हजर केल्याचे यातील दलाल चाैबे याला १५ हजार रुपये तर कुरणेला दोन हजार रुपये दिल्याचे पुरावेही पोलिसांच्या हाती लागले.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सपना केचे यांच्या पथकाने ॲड. उथ्थल याला २ जुलै २०२४ रोजी अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने बुधवारी दिले. त्यानंतर तो जामिनावर सुटला. वकिलावर गुन्हा दाखल न हाेण्यासाठी पाेलिसांवर काही वकिलांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र, दबावाला न जुमानता वकिलास अटक केली असून या प्रकरणातील महिलेचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.