योजनांचा लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांची खैर नाही; कारवाई होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 12:58 AM2021-02-07T00:58:09+5:302021-02-07T00:58:21+5:30
खऱ्या लाभधारकांना मिळेल दिलासा
- सुरेश लोखंडे
ठाणे : जिल्ह्यात संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी आदी विविध अर्थसाहाय्य योजना राबविण्यात येत आहेत. वयोवृद्धांसाठी श्रावणबाळ सेवा योजना, अनाथ, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, दिव्यांग, आदींकडून दरमहा या योजनांच्या अर्थसाहाय्यांचा लाभ घेतला जात आहे. मात्र, योजनांच्या निकषांत न बसणारेही त्याचा लाभ घेत आहेत. अशा लाभार्थ्यांवर कारवाईच्या हालचाली जि.प.ने सुरू केल्या आहेत.
जिल्ह्यात विशेष साहाय्य योजनेंतर्गत अनुदान वाटपाच्या योजना सुरू आहेत. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांच्या यादीत नाव असलेल्या ६५ व ६५ वर्षांवरील वृद्धांना इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन सुरू आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनाही राबविण्यात येत आहे. इंदिरा गांधी योजनेद्वारे लाभार्थ्यांना प्रतिमहा २०० व ५०० रुपये निवृत्ती मिळते. त्याचा लाभ जिल्ह्यातील ४,२९३ वृद्धांना मिळतो. यंदा ७१ लाखांचे अनुदान मिळाले होते. त्यातून ऑगस्टपर्यंत ६२,५१,५०० पर्यंतचे अनुदान वाटप झाले आहे.
लाभार्थी कुठल्या योजनेचे किती?
संजय गांधी योजना : ९४५७
श्रावणबाळ योजना : ४९९६
इंदिरा गांधी योजना : ४२९३
एकूण : १८७४६
घटस्फोटित लाभार्थी
लाभार्थी महिलेचा पुनर्विवाह झाला का, याची चौकशी होईल. यासाठी रेशनकार्डची सत्यता पडताळून पाहिली जाणार आहे.
परित्यक्ता
या महिला बहुधा शासकीय, संस्थेच्या अनाथालयात राहतात. यामुळे या संस्थेत राहात असल्याचा दाखला लाभार्थ्यांना द्यावा लागणार आहे.
विधवा महिला लाभार्थी
या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेला मुलगा असल्यास आणि तो २५ वर्षांचा झाल्यास या अर्थसाहाय्याचा लाभ बंद होतो. यासाठी संबंधित मुलाच्या जन्माचा, शाळेचा दाखला जोडण्याची सक्ती होते. आता या दाखल्याची चौकशी व तपासणी होणार आहे. मुली असल्यास मात्र या योजनेचा लाभ घेता येणे शक्य होईल.
दिव्यांग
लाभार्थ्यांना त्यांच्या बँक पासबुकच्या इंट्रीच्या झेरॉक्सप्रती द्याव्या लागला आहे. यामुळे या खात्यातील त्यातील व्यवहारास अनुसरून तपासणी करण्यात येणार आहे. यामुळे लाभार्थी अन्य योजनांचाही लाभ घेतात का, याची पडताळणी होईल.
जिल्ह्यातील या केंद्र व राज्य शासन पुरस्कृत अर्थसाहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांचे व सर्वेक्षण आणि पडताळणी कोरोनामुळे रखडली होती. पण आता यानुसार लवकरच जिल्ह्यात तपासणी करून बोगस लाभार्थ्यांचा शोध घेऊन कारवाई करण्यात येईल.
- शीतल जाधव,
तहसीलदार, ठाणे