उल्हासनगरात बोगस पोलिसाला अटक
By सदानंद नाईक | Published: January 5, 2023 06:14 PM2023-01-05T18:14:29+5:302023-01-05T18:14:55+5:30
मध्यवर्ती पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून एका रिक्षाचालकाला त्याने एक तास शहरात फिरविल्याचे उघड झाले.
उल्हासनगर : पोलीस असल्याची बतावणी करून शांतीनगर येथील राकेश झा या पानसेंटर दुकानदाराकडे ५०० रुपयांची मागणी करणारा बोगस पोलीस गजाआड झाला. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून एका रिक्षाचालकाला त्याने एक तास शहरात फिरविल्याचे उघड झाले.
उल्हासनगर कॅम्प नं-३ शांतीनगर येथे राकेश झा यांचे पानसेंटर नावाचे दुकान आहे. गुरवारी सकाळी एक इसम येऊन त्याने स्वतःला पोलीस असल्याची बतावणी केली. तसेच दुकानात गुटखा ठेवला असून दोन नंबरचा धंदा करीत असल्याची धमकी दुकानदार झा यांना देऊन ५०० रुपयांची मागणी केली. झा यांना पोलिसांची बतावणी करणाऱ्या इसमा बाबत संशय आल्यावर, त्यांनी गुपचूप मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या संपर्क साधला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्या इसमाला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत सदर इसमाचे नाव दिलीप शांताराम पाटील असे असून तो जळगाव येथील राहणारा आहे. असा बोगस पोलिसाला मध्यवर्ती पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली. त्याने एका रिक्षाचालकाला पोलीस असल्याची बतावणी करून शहरात एक तास सकाळी फिरविल्याचेही उघड झाले.