मुलाच्या सुटकेसाठी खंडणी उकळणाऱ्यास सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 12:27 AM2021-09-23T00:27:54+5:302021-09-23T00:30:15+5:30
अल्पवयीन मुलाच्या सुटकेच्या बदल्यात त्याच्या पालकांकडून एक लाखाची खंडणी उकळणाºया कलिम इशाक अन्सारी याला ठाण्याचे न्यायाधीश शैलेंद्र तांबे यांनी मंगळवारी सात वर्षांच्या सक्तमजुरीची तसेच दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : अल्पवयीन मुलाच्या सुटकेच्या बदल्यात त्याच्या पालकांकडून एक लाखाची खंडणी उकळणाºया कलिम इशाक अन्सारी याला ठाण्याचे न्यायाधीश शैलेंद्र तांबे यांनी मंगळवारी सात वर्षांच्या सक्तमजुरीची तसेच दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षेचाही आदेश देण्यात आला आहे.
पोखरण रोड क्र मांक दोन येथील एका रहिवाशाच्या १५ वर्षीय मुलाला २७ मार्च २०१५ रोजी अज्ञात व्यक्तीने अपहरण केले होते. या प्रकरणी त्यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर १ एप्रिल २०१५ रोजी तक्र ारदारांच्या मोबाइलवर एका अनोळखीचा फोन आला होता. त्यानेच मुलाच्या सुटकेसाठी त्यांच्याकडे एक लाखाच्या खंडणीची मागणी केली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे पोलिसांनी तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त भरत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तिघांना अटक केली. यामधील मुख्य आरोपीला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतले होते. आरोपींच्या अटकेनंतर मुलाचे त्यांनी अपहरण केले नसल्याचे समोर आले. पण, शिक्षा झालेल्या आरोपीने खंडणीची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. मुलगा सापडत नसल्याने याचा तपास ठाणे शहर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाकडे दिल्यानंतर या पथकाचे प्रमुख तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या पथकाने त्या मुलाला ३० जानेवारी २०१९ रोजी नवी मुंबईतील नेरूळ येथून शोधून पालकांच्या स्वाधीन केले. या तीन आरोपींपैकी एक जण अल्पवयीन होता. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यावर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यावर हा खटला न्यायाधीश शैलेंद्र तांबे यांच्यासमोर मंगळवारी सुनावणीसाठी आला. त्यावेळी सरकारी वकील विनीत कुलकर्णी यांनी सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून कलिम इशाक अन्सारी यालाच दोषी ठरविण्यात आले. त्याला सात वर्षांची सक्तमजुरीची आणि दहा हजार रु पये दंडाची शिक्षा सुनावली.