बोईसरच्या रस्त्यांना खांबाचा अडसर
By admin | Published: April 23, 2016 01:48 AM2016-04-23T01:48:01+5:302016-04-23T01:48:01+5:30
अनेक अडथळ्यांवर मात करून पालघर-बोईसर या मुख्य रस्त्यावरील नवापूर नाका ते साईबाबा मंदिर या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होऊनही विजेचे काम जैसे थे स्थितीमध्ये आहे
बोईसर : अनेक अडथळ्यांवर मात करून पालघर-बोईसर या मुख्य रस्त्यावरील नवापूर नाका ते साईबाबा मंदिर या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होऊनही विजेचे काम जैसे थे स्थितीमध्ये आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असल्यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यात असलेल्या वीजखांबांमुळे अपघाताची शक्यता आहे.
पालघर-बोईसर रस्ता प्र.रा.मा.क्र. ४ किमी ११/७०० ते १२/१०० मध्ये सदर चौपदरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र. १ पालघर यांच्यामार्फत हाती घेण्यात आले असून हे काम बहुतांश पूर्ण होऊन आता गटारलाइनचे काम सुरू आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम खात्याने वीज वितरण कंपनीला खांब हटवण्यासंदर्भात पत्र देऊनही अजून कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. गटाराच्या कामातही काही झाडांचा अडथळा येत आहे. काम सुरू असलेले गटार सांडपाण्याने तुडुंब भरले आहे.
२००६ मध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याने मोजणी करून नकाशा तयार केला होता. मात्र, सध्या सुरू असलेले काम हे नकाशानुसार नसून रस्त्याची मध्यरेषा आखताना संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याचे बोईसरचे माजी ग्रामपंचायत सदस्य नितीन ठाकूर यांनी सांगितले. तसेच रस्त्यावरील विजेचे खांब हटवण्यासंदर्भात सिटीझन फोरम आॅफ बोईसरतर्फे महावितरणला निवेदन देण्यात आले असल्याचे फोरमचे अध्यक्ष डॉ. सूर्यकांत संखे यांनी लोकमतला सांगितले. (वार्ताहर)