बोईसर ग्रामपंचायतीचे स्पेशल आॅडिट ?

By admin | Published: August 12, 2016 01:26 AM2016-08-12T01:26:28+5:302016-08-12T01:26:28+5:30

बोईसर ग्रामपंचायतीच्या १८ जुलै २०१६ पूर्वीच्या कार्यकालामध्ये झालेल्या व्यवहारामध्ये अनिमितता, चुकीच्या पद्धतीने केलेली कामे आणि गैरव्यवहार झाला आहे काय?

Boiser Gram Panchayat special audit? | बोईसर ग्रामपंचायतीचे स्पेशल आॅडिट ?

बोईसर ग्रामपंचायतीचे स्पेशल आॅडिट ?

Next

बोईसर : बोईसर ग्रामपंचायतीच्या १८ जुलै २०१६ पूर्वीच्या कार्यकालामध्ये झालेल्या व्यवहारामध्ये अनिमितता, चुकीच्या पद्धतीने केलेली कामे आणि गैरव्यवहार झाला आहे काय? याची शहनिशा करण्यासाठी बोईसर ग्रामपंचायतीच्या मागील कार्यकालाचे स्पेशल आॅडिट करण्याची मागणी नवनिर्वाचित बोईसरच्या सरपंच व उपसरपंचांनी पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्याकडे केली आहे. त्यांनी स्पेशल आॅडीट करण्याचे संकेत दिले आहेत. बोेईसर ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशाली बाबतर व उपसरपंच राजू करवीर यांनी त्यांच्या काही सहकारी सदस्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ग्रामपंचपायतीचा दि. १८ जुलै रोजी कार्यभार स्वीकारला त्या दिवशी ठाणे डिस्ट्रीक्ट बॅकेमधील पाणीपुरवठा खात्यामध्ये अवघे ७२६ रूपये शिल्लक होते तर दि. १५ जुलै २०१६ रोजी मुद्रांक शुल्काच्या रूपात जमा झालेला ४५ लाख ५० हजाराचा निधी ज्या दिवशी डिपॉझीट झाला त्या एकाच दिवशी त्याचे वाटप केले. त्यापैकी काही रक्कम रोखीने तर काही बेअरर चेकने दिली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून निधी अभावी आम्ही कार्यभार कसा सांभाळणार असा सवाल केला. अस्तीत्वात नसलेल्या झेरॉक्स कॉपीचे, ग्राम-पंचायतीच्या दोन सायकलच्या दुरूस्तीचे तसेच वृत्तपत्रात दिलेल्या जाहिराती इ. वर लाखो रूपये खर्च दाखविण्यात आला असून कायम स्वरूपी सफाई कामगार असतांनाही अनेक अतिरीक्त कामगार ठेका पध्दतीने (रोजंदारी) दाखवून त्यामध्ये गैरव्यवहार झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सन २०१५-१६ या वित्तीय वर्षामधील व्हॉऊचर वर सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांची सहीच नसल्याचे सांगून मोठया प्रमाणात अपहार झाल्याची शक्यता वर्तविली गेली असून अशाच पध्दतीची तक्रार बसपाचे पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव यांनीही केली असून संबंधीतांवर कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यानच्या काळामध्ये वरीष्ठ लिपिक संतोष मराठे यांनी लक्ष्मण कॉम्पलेक्स कडून आलेल्या निधीची कॅशबुकमध्ये एन्ट्री न कराता तो निधी तेथील रस्त्यांच्या कामासाठी खर्च केला असल्याचे उपसरपंच करवीर यांनी सांगून या संदर्भात खुलासा मागणारे पत्र मराठे यांना देण्यात आले होते त्याला उत्तर देतांना या घटनेची संपूर्ण चौकशी पंचायत समिती मार्फत झाली असल्याचे उत्तर देण्यात आले परंतु, हा खुलासा समाधानकारक नाही म्हणून त्यांना चौकशी काळापर्यंत निलंबनाचे पत्र दि. १० आॅगस्ट रोजी काढण्यात आले होते. परंतु ते पत्र मराठे यांनी स्वीकारले नाही तर या निलंबन पत्रानंतर तसेच चर्चेतून काही मार्ग न निघाल्यास ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा संप होण्याची शक्यता आहे.

Web Title: Boiser Gram Panchayat special audit?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.