बोलावा विठ्ठल... पाहावा विठ्ठल...!
By admin | Published: July 16, 2016 01:41 AM2016-07-16T01:41:22+5:302016-07-16T01:41:22+5:30
संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठू माऊलीचा गजर आज संपूर्ण पालघर जिल्ह्यातील मंदिरासह शाळा, संस्थांमध्ये घुमत होता. तर जिल्ह्यातील मंदिरासमोर भक्तांच्या मोठमोठ्या रांगा लागल्याचे दिसत होते.
पालघर : संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठू माऊलीचा गजर आज संपूर्ण पालघर जिल्ह्यातील मंदिरासह शाळा, संस्थांमध्ये घुमत होता. तर जिल्ह्यातील मंदिरासमोर भक्तांच्या मोठमोठ्या रांगा लागल्याचे दिसत होते.
अवघ्या वारकऱ्यांचे माहेरघर म्हणजे पंढरपूर. दरवर्षी लाखो वारकरी खांद्यावर भगवा पताका उंचावून टाळ मृदृंगाच्या गजरात विठू माऊलीचा जयघोष करीत पंढरीत जमत असतात. मात्र ज्याला वारीला जाणे जमले नाही. त्या भक्तांनी आज पहाटेपासूनच पालघर, उमरोली, नवली इ. सह आपल्या भागातील मंदिरांमध्ये प्रवेशासाठी रांगा लावल्या होत्या.पालघरच्या विठ्ठल रखुमाई मंदिर हे ६७ वर्षापूर्वीचे सर्वात जूने मंदिर असून माई दांडेकर पंढरपूरला गेले असताना एका अज्ञात व्यक्तीने दिलेल्या विठ्ठल रखुमाईच्या मूर्त्या सन १९४९ सालीमंदिरात विराजमान करण्यात आल्या आहेत. या मूर्त्या मार्इंना दिल्यानंतर समोरील व्यक्ती क्षणार्थात दिसेनासा झाल्यानंतर या मूर्त्यांच्या स्थापनेनंतर अनेक भक्तांना दर्शनानंतर अनुभव आल्याने हे देऊळ एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. आज देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त मंदिरात पहाटे पाच वाजल्यापासून अनेक धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात काकड आरती, शाही स्रान, दादासाहेब निकम बुवांचे किर्तन ज्येष्ठ नागरीक भजनी मंडळाचे भजन, ऋतुराज वाद्यवृंद मंडळीचे भक्तीपर गीते यांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आल्याचे ट्रस्टी सुरेश तळेकर, अरविंद वारखेडे, सुरेश जोशी यांनी सांगितले.
वरोरच्या पुरातन विठ्ठल मंदिरात जनसागर लोटला
डहाणू : तमाम वारकऱ्यांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलाच्या ओढीने हजारो वारकरी आज आषाढी एकादशीनिमित्त धाकटी पंढरी म्हणून विख्यात असणाऱ्या वरोर (ता. डहाणू) येथे एकवटलेली पहायला मिळाली. यावेळी झालेला रिंगण सोहळा अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा होता.
येथील पुरातन विठ्ठलरखुमाई मंदिरात टाळमृदंगाच्या गजरात आणि विठू माऊलीच्या नामघोषात दंग होऊन विठूमाऊली आणि रखुमाईमातेच्या दर्शनाच्या ओढीने डहाणू, दांडी, तारापूर, चिंचणी, गुंगवाडा, तिडयाळे अशा दूरदूरच्या अनेक गावातून आलेल्या सुमारे वीस हजार वारकऱ्यांनी विठू माऊलीचे दर्शन घेतले.
प्रति पंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या प्राचीन विठ्ठलरखुमाई मंदिरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लागल्या होत्या. धाकटी डहाणू आणि दांडी भागातून वारकऱ्यांच्या अनेक दिंड्या टाळमृदंगाच्या गजरात विठ्ठल नामात दंग होऊन येत होत्या. त्यांचे वरोर गावच्या बसस्थानकात सबंध रस्ताभर रांगोळ्या घालून नयनरम्य रिंगण झाले. तसेच हजारो भाविकांनी समुद्रात स्नान केले. अनेक मुलांनी यानिमित्ताने शाळेला दांडी मारल्याने समुद्र स्नानाला त्यांनी हजेरी लावली होती. सर्व वारकऱ्यांची बसण्याची आणि प्रसादाची व्यवस्था विनीत पाटील अनेक वर्षांपासून करीत आहेत. तर विठ्ठल रखुमाई ट्रस्टचे अध्यक्ष शरद पंडित, विनय खांडेकर, पांडुरंग वनमाळी, चित्ररेखा राऊत, वैकुंठ विनदे, गणेश दवणे, धर्मा नाईक यांनी वारकऱ्यांना पांडुरंगाचे दर्शन सुलभ रीतीने घेता यावे म्हणून चोख व्यवस्था केली होती. त्याचबरोबर पाणी, अल्पोपाहार व भजन कीर्तनाची देखील व्यवस्था होती. (वार्ताहर)
विक्रमगडमध्ये तालबद्ध जयघोष
विक्रमगड : विठ्ठल विठ्ठल, हरी ओम विठ्ठल अशा जयघोष आज विक्रमगड येथील विठ्ठलरुक्मिणी मंदिरात सुरू होता. सकाळपासून मंदिरात भाविकांची गर्दी सुरू होती. विठ्ठल मंदिरामध्ये सकाळी ६ वाजता कृष्णा मलराज यांच्या हस्ते महापूजा व अभिषेक करण्यात आला.
अरविंद आश्रमशाळेतील सुमारे बाराशे विद्यार्थ्यांनी दादडे ते विक्रमगड हे ६ ते ७ कि.मी. अंतर पायी दिंडी काढण्यात आली होती. हे १३ वे वर्ष होते. तर ज्ञानसाधना विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही विक्रमगड शहरातून विठू नामाचा गरज करून विठ्ठल मंदिरात दर्शन घेतले. शाळेतील विद्यार्थ्यांच्या टाळ, मृदंगाच्या दिंड्या येताच मंदिर परिसरात भक्तीने फुलून गेले होते. गेल्या अनेक वर्षांच्या या परंपरेत आजपर्यंत खंड पडला नाही. दादडे आश्रमशाळेची दिंंडी हे हया दिवशी एक वेगळेच आकर्षण असते. तालबद्ध वाजंत्रीच्या व विठ्ठलाच्या जयघोषात लेझीम नृत्य सादर केले.(वार्ताहर)
पालघर : नद्यांना आपल्या संस्कृतीमध्ये मोठे मानाचे स्थान असल्याने आज पंढरपूरमधील चंद्रभागा नदीमध्ये स्थान करण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. परंतु या सर्व पवित्र नद्या समुद्रालाच मिळत असल्याने सातपाटीसह किनारपट्टीवरील समुद्रात स्थान करण्यासाठी स्थानिक भक्तांनी आज पहाटेपासून मोठी गर्दी केली होती. यात महिलांसह लहान मुलांचा मोठा सहभाग होता. आज सातपाटी, वडराई, माहीम, केळवे, शिरगाव इ. गावातील भाविकांनी भर मुसळधार पावसाची पर्वा न करताच पहाटे पासून समुद्रात स्रानाला सुरूवात केल्याचे दिसून आले. पुरूष, महिला, तरुणवर्ग यांसह लहान बच्चेकंपनीनेही विठूरायाचा नावाचा जयघोष केला.मनोर : आषाढी एकादशीनिमित्त मनोर गाव ते गावदेवी मंदिरच्या पटांगणात वृक्षारोपण केले. तसेच विठ्ठल मंदिर येथे सकाळी काकड आरतीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रतिवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त मनोर परिसरातील हिंदू समाजातील महिला, पुरूष, तरुण वर्ग व लहान मुले विठ्ठल मंदिर मनोर येथे आषाढी उत्साहात साजरी करतात. आज सकाळी ६ वाजताच्या दरम्यान विठ्ठल मंदिरात काकड आरती, भजन, कीर्तन संपन्न झाले.
गावदेवी मंदिर पटांगणात रजनीकाकू, अर्चना घोलप, उज्ज्वला भानुशाली, इंदुमती बोरकर, घरतताई, दत्तात्रय अप्पाजी, सुनील बोरकर, अरविंद भोई, रुपेश बारी, दिलीप देसाई, निलेश बोरकर, आप्पा गोसावी, रत्नदीप व एडवणकर यांनी झाडांचे वृक्षारोपण केले.