समित्यांच्या निर्मितीला खीळ!
By Admin | Published: December 14, 2015 01:15 AM2015-12-14T01:15:43+5:302015-12-14T01:15:43+5:30
कोकण विभागीय आयुक्तांकडे केल्या जाणाऱ्या गट नोंदणीच्या आधारावर स्थायी, महिला बालकल्याण समित्यांची समीकरणे ठरणार असून त्याचबरोबर स्वीकृत सदस्यांची निवड देखील केली जाणार आहे
प्रशांत माने, कल्याण
कोकण विभागीय आयुक्तांकडे केल्या जाणाऱ्या गट नोंदणीच्या आधारावर स्थायी, महिला बालकल्याण समित्यांची समीकरणे ठरणार असून त्याचबरोबर स्वीकृत सदस्यांची निवड देखील केली जाणार आहे. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर एक महिन्यानंतर म्हणजेच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नोंदणी झालेल्या राजकीय पक्षांच्या गटाचा अहवाल कोकण आयुक्तांकडून येणे अपेक्षित होते. परंतु याला अद्यापपर्यंत मुहूर्त न मिळाल्याने समित्यांच्या निर्मितीला एकप्रकारे खीळ बसली असून परिणामी राजकीय पदाधिकाऱ्यांसह इच्छुकांची घालमेल वाढली आहे.
कोणत्या राजकीय पक्षाकडून कितीचा गट तयार केला जातो? आणि यात त्यांना अपक्षांची किती साथ लाभते? हे या गटनोंदणीतून समोर येणार आहे. आॅक्टोबरमध्ये पार पडलेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याच राजकीय पक्षाला बहुमत मिळालेले नाही. यात एकमेकांच्या विरोधात लढलेली शिवसेना-भाजपा सत्तेसाठी एकत्र आल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान महापौर आणि उपमहापौरपदाच्या झालेल्या निवडीनंतर आता स्थायी समिती, महिला व बालकल्याण आणि स्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडणार आहे.
शिवसेना ५२, भाजपा ४२, मनसे ९, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २, एमआयएम १, बसपा १ असे पक्षीय बलाबल असून, ९ नगरसेवक अपक्ष आहेत. कोणत्याच पक्षाला बहुमत नसताना कोणाला या अपक्षांची साथ लाभते? हे गटनोंदणीतून स्पष्ट होणार आहे. यावरच पुढील समित्यांची समीकरणे देखील ठरणार आहेत. स्वीकृतचे पाच सदस्य निवडले जाणार आहेत. स्थायीचे १६ सदस्य तर महिला बालकल्याण समितीचे ११ सदस्य निवडले जाणार आहेत. सध्याचे पक्षीय बलाबल पाहता स्वीकृतपदी शिवसेनेचे तीन तर भाजपचे २ सदस्य सहजपणे निवडून जाऊ शकतात. दरम्यान नऊ नगरसेवक निवडून आलेल्या मनसेला एका अपक्षाचा पाठिंबा मिळाला आहे. शिवसेना किती सदस्यांचा गट करते यावर मनसेचाही एक सदस्य स्वीकृत पदावर निवडला जाऊ शकतो.
स्थायी आणि महिला बाल कल्याण समितीतही गटाच्या नोंदणीनुसार पक्ष सदस्यांची वर्णी लागणार आहे. विरोधी पक्ष नेता कोणत्या पक्षाचा हे देखील नोंदणीच्या आधारेच स्पष्ट होणार आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ३० दिवसांच्या आत राजकीय पक्षांना गटाची नोंदणी करावयाची होती. निवडणुकीचा निकाल २ नोव्हेंबरला लागला. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात या निवड प्रक्रियांबाबत विशेष महासभा होण्याची दाट शक्यता वर्तविली जात होती. परंतु अद्याप गट नोंदणी अहवाल मनपाला मिळालेला नाही.