येऊर मधील बॉम्बे डक हॉटेलच्या अतिक्रमणावर अखेर हातोडा
By अजित मांडके | Published: March 17, 2023 06:13 PM2023-03-17T18:13:44+5:302023-03-17T18:14:05+5:30
ही कारवाई यापुढेही सुरुच राहणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.
ठाणे : येऊर येथील अनाधिकृत हॉटेल, लॉन्सवरुन कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने आवाज उठविल्यानंतर येथील स्थानिकांनी देखील येथील वातावरण त्यामुळे कसे गढूळ होत आहे याचे दाखले दिले आहेत. असे असतांना आता उशीराने जागे झालेल्या ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने येऊर येथील बॉम्ब डक या हॉटेलमधील वाढीव अनाधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई केल्याने सर्वांच्याच भुवय्या उंचावल्या आहेत. त्यातही ही कारवाई यापुढेही सुरुच राहणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.
अनाधिकृत बांधकामांचा मुद्दा ठाणे शहरात मागील काही महिन्यापासून गाजत आहे. त्यानंतर मागील काही दिवसापासून येऊर येथील वाढत्या अतिक्रमणांमुळे देखील येऊरचा बळी जात असल्याचा मुद्दा राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने उपस्थित केला होता. येथील अनाधिकृत हॉटेल व इतर आस्थापनांवर कारवाईची मागणी कॉंग्रेसने केली होती. तसेच गुरुवारी येथील स्थानिकांनी देखील या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी येथील बॉम्बे डक या हॉटेलमधील वाढीव अनाधिकृत बांधकामांवर कारवाई केली.
वर्तक नगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. संबधीत हॉटेल धारकाला दोन महिन्यापूर्वी वाढीव अनाधिकृत बांधकाम काढून घेण्याबाबत नोटीस देण्यात आली होती. परंतु त्यानंतरही त्याने वाढीव बांधकाम न काढल्याने अखेर ही कारवाई करण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले.
दरम्यान येथील अनाधिकृत हॉटेल आणि इतर आस्थापनांची यादीच आता वर्तक नगर प्रभाग समितीने तयार केली असून त्यानुसार आता त्या सर्वांवर टप्याटप्याने कारवाई केली जाणार असल्याची माहिती पालिकेने दिली.