बोनस मागच्या वर्षी इतकाच हवा , कामगारांची मागणी : केडीएमसी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर घेतली सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 02:13 AM2017-10-11T02:13:30+5:302017-10-11T02:13:45+5:30
केडीएमसी प्रशासनाने कर्मचा-यांना १२ हजार रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय घेतला. मात्र, तो कर्मचा-यांना मान्य नाही. मागच्या वर्षी इतकीचा १४ हजार ५०० रुपये बोनस मिळावा, या मागणीवर कामगार ठाम आहेत.
कल्याण : केडीएमसी प्रशासनाने कर्मचा-यांना १२ हजार रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय घेतला. मात्र, तो कर्मचा-यांना मान्य नाही. मागच्या वर्षी इतकीचा १४ हजार ५०० रुपये बोनस मिळावा, या मागणीवर कामगार ठाम आहेत. याच मागणीसाठी मंगळवारी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने द्वार सभा घेतली.
कामगार सेनेचे प्रकाश पेणकर यांनी या सभेला संबोधित केले. या वेळी प्रवेशद्वाराजवळ कामगारांनी गर्दी केली होती. महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. महापालिकेचे सर्व कराच्या वसुलीतून ८४० कोटी रुपये उत्पन्न मिळणार आहे. मात्र, असे असताना १ हजार १४० कोटी रुपयांची विकासकामे महापालिकेने हाती घेतली आहे. त्यात ६० कोटी रुपये कंत्राटदारांची बिला द्यायची आहे. महापालिकेच्या बजेटमध्ये ३०० कोटी रुपयांची तूट आहे. ही तूट भरून काढण्यासाठी सरकारकडे निधी अथवा वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, कर्मचारी पगार व बोनस रोखला जाणार नाही, असे आयुक्त पी. वेलरासू यांनी महासभेत स्पष्ट केले होेते.
आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने १२ हजारांचा बोनस दोन टप्प्यांत दिला जाणार आहे. महापालिकेने मागच्या वर्षी १४ हजार ५०० रुपये बोनस दिला होता. यंदाच्या वर्षी अडीच हजार रुपये कमी बोनस दिला जात आहे. मागच्या वर्षी इतकाच बोनस दिला जावा, या मागणीवर कामगार ठाम आहेत.
‘१४ आॅक्टोबरला द्या बोनस’ : पेणकर यांनी १४ हजार ५०० रुपयांच्या बोनसच्या मागणीचे पत्र महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याकडे दिले आहे. या विषय आयुक्तांशी चर्चा करून काय ते ठरविले जाईल, असे आश्वासन देवळेकर यांनी दिले आहे. दिवाळी १७ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. किमान १४ आॅक्टोबरला बोनस मिळाल्यास दोन दिवस तरी कामगारांना दिवाळीची खरेदी करता येईल, याकडे पेणकर यांनी लक्ष वेधले आहे.