विक्रमगडमध्ये बोहाडाचा प्रारंभ
By admin | Published: March 15, 2017 01:57 AM2017-03-15T01:57:39+5:302017-03-15T01:57:39+5:30
पालघर जिल्हातील विक्र मगड, जव्हार, मोखाडा, डहाणू या आदिवासी भागात होळी व रंगपंचमीच्या दिवसापासून ‘बोहाडा’ या आदिवासी लोककलेच्या उत्सवास सुरवात झाली आहे.
संजय नेवे , विक्रमगड
पालघर जिल्हातील विक्र मगड, जव्हार, मोखाडा, डहाणू या आदिवासी भागात होळी व रंगपंचमीच्या दिवसापासून ‘बोहाडा’ या आदिवासी लोककलेच्या उत्सवास सुरवात झाली आहे.
विक्र मगड तालुक्यातील कुर्झे (धगडीपाडा), वेहेलपाडा, आलोंडे, करढन, दादडे, देहेर्जे, उपराळे यासारख्या गावं पाड्यात यात्रेच्या निमित्ताने होणाऱ्या या उत्सवाच्या पहिल्या दिवशी सनई, संबळ, सूर या आदिवासीच्या विविध वाद्यातून गणपतीचा मुखवटा घातलेले सोंग काढण्यात येते. आज वीज असूनही त्याच्याबरोबर टेंभे (मशाली) घेतलेले भाविक असतात. हे सोंग रस्त्याच्या विशीष्ट मार्गाने चालत मध्यभागी सजवलेल्या वर्तुळात येते, त्या भागाला चांदणी असे म्हंटले जाते. अशा पद्धतीने गणपती सोंगानंतर सतत २ किवा ६ दिवस देवताची सोंगे काढून सांगता गावदेवी मातेच्या सोंगाने होते.
या बोहाड्यात अनेक वस्तूची विक्री करण्यासाठी लांब-लांब पल्ल्याचे व्यापारी येतात. विशेषत: या उत्सवा दरम्यान विविध जाती धर्माचे लोक एकत्र येऊन आम्ही एक आहोत या गोष्टीची जाणीव करून देतात. बोहाडा सुरु होण्यापूर्वी एक मिरवणूक काढली जाते तिला आदिवासी भाषेत ‘मोहाटी’ म्हणून संबोधले जाते. या बोहाडा उत्सवातील सोंग घेणारी मंडळी ज्या दिवशी मुखवटा धारण करायचा असतो त्या दिवशी उपवास करतात. ही सोंगे परंपरेने त्या घराण्यात चालत आलेली असतात. प्रत्येक सोंगाचे वाजवण्याचे ठेके वेगवेगळे असल्याने सोंग बदलले कि ठेका बदलत असतो, अशा तऱ्हेने पहाटेपर्यत विविध प्रकारचे मुखवटे धारण केलेली सोंगे येत असतात. या पद्धतीने दिवस रात्र मजुरी करणारे येथील आदिवासी लोक आपला थकवा घालवून पारंपरीक बोहाडा उत्सव मोठ्या मौज-मज्जेने, आनंदाने साजरा करतात.