ठाण्यातही पुस्तक आदानप्रदान सोहळा
By admin | Published: April 17, 2017 04:41 AM2017-04-17T04:41:33+5:302017-04-17T04:41:33+5:30
वाचनसंस्कृतीतील नवा प्रयोग म्हणून ज्याकडे पाहिले जात होते त्या डोंबिवलीतील पुस्तक आदान-प्रदान सोहळ््यात आठवडाभरात ५० हजारांहून अधिक पुस्तके गोळा झाली आहेत
डोंबिवली : वाचनसंस्कृतीतील नवा प्रयोग म्हणून ज्याकडे पाहिले जात होते त्या डोंबिवलीतील पुस्तक आदान-प्रदान सोहळ््यात आठवडाभरात ५० हजारांहून अधिक पुस्तके गोळा झाली आहेत. त्यातील ३५ हजार पुस्तके वाचकांनी बदलून घेतली. आता उरलेली १५ हजार पुस्तके वेगवेगळ््या गरजू संस्था, वृध्दाश्रम आणि खेडेगावातील शाळांना भेट दिली जाणार आहेत, अशी माहिती पै फ्रेंडस लायब्ररीचे पुंडलिक पै यांनी दिली. आता ही आदान-प्रदान चळवळ पुढील महिन्यात ठाण्यात होणार आहे.
पै फे्र न्डस लायब्ररी, टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ आणि डोंबिवलीकर- एक सांस्कृतिक परिवार यांनी हा उपक्रम आयोजित केला होता. वाचकांनी आपल्याकडील पुस्तके आणयाची आणि बदलून घ्यायची अशी साधी-सोपी कल्पना त्यामागे होती. त्यात अनेक वाचकांना हवी ती पुस्तके मिळाली, तर काहींनी मनाजोगती पुस्तके न मिळाल्याने त्यांचा हिरमोड झाला. असे असले तरी बहुतांश वाचकांना हा उपक्रम मनापासून आवडला. याला जोडूनच पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आले होते. तेथेही वेगळ््या पुस्तकांची खेरदी झाली. दररोज नवनव्या पुस्तकांची भर पडत गेल्याने या उपक्रमात सतत नाविन्य राहिले.
पोलिसांच्या वाचनालयाला ७०० पुस्तकांची भेट
शिकण्याच्या वयात गुन्हेगारीकडे वळणाऱ्या लहान मुलांना आणि तरूणांना शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यावे, आणि त्यांचे भविष्य सुधारावे, यासाठी अशा ठिकाणी वाचनालयाची गरज ओळखून विष्णुनगर पोलिसांनी डोंबिवली पश्चिम येथील सिध्दार्थनगर भागात नुकतेच वाचनालय सुरू केले आहे. त्याला या आदान-प्रदानातील ७०० पुस्तके भेट देण्यात आली आहेत. टिळकनगर शाळेलाही ५०० पुस्तके देण्यात येणार आहेत. इतर गरजू संस्थांनी पुस्तकांसाठी पै ग्रंथालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. (प्रतिनिधी)