उल्हासनगर महापालिकेचे पुस्तक प्रदर्शन
By सदानंद नाईक | Updated: May 1, 2024 17:50 IST2024-05-01T17:50:11+5:302024-05-01T17:50:50+5:30
उल्हासनगर महापालिकेने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ‘सिंधू भवन’ येथे ‘चला पुस्तकांशी दोस्ती करू या’ या संकल्पनेवर आधारीत पुस्तक प्रदर्शनाचे करण्यात आले

उल्हासनगर महापालिकेचे पुस्तक प्रदर्शन
उल्हासनगर : आयुष्य घडविण्यासाठी पुस्तकांशी दोस्ती करा. असे प्रतिपादन आयुक्त अजीज शेख यांनी महापालिकेने आयोजित केलेल्या पुस्तक प्रदर्शन कार्यक्रमात केले. यावेळी यूपीएससी परीक्षा पास होऊन आयएएस झालेल्या अभिषेक टाले यांचा सत्कार करण्यात आला.
उल्हासनगर महापालिकेने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ‘सिंधू भवन’ येथे ‘चला पुस्तकांशी दोस्ती करू या’ या संकल्पनेवर आधारीत पुस्तक प्रदर्शनाचे करण्यात आले. प्रदर्शन १ ते ३ मे २०२४ रोजी असे तीन दिवस सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत चालू राहणार आहे. पुस्तक प्रदर्शनाच्या सोहळ्यावेळी आयुक्त अजीज शेख यांनी आयुष्य घडविण्यासाठी पुस्तकांशी दोस्ती करण्याचा सल्ला उपस्थित विध्यार्थांना दिला. कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त किशोर गवस, सुभाष जाधव व सदामंगल पब्लिकेशनचे प्रकाशक संदीप चव्हाण उपस्थित होते. मतदारांमध्ये मतदान जनजागृती व्हावी, यासाठी महापालिकेने पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केले. पुस्तक खरेदीवर विद्यार्थ्यांना २० टक्के तर ओळखपत्र असणाऱ्यांना ३० टक्के सवलत दिल्याची घोषणा महापालिकेने केली.
पुस्तक प्रदर्शन ठिकाणी सिंधी साहित्य अकादमी यांच्यामार्फत सिंधी साहित्याचा स्वतंत्र स्टॉल लावण्यात आलेला आहे. अनेक सिंधी पुस्तके याठिकाणी उपलब्ध आहेत. महापालिकेच्या शाळा व सिंधी शाळेच्या विद्यार्थ्यांनी यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महापालिका जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे यांनी तर आभारप्रदर्शन उपायुक्त सुभाष जाधव यांनी केले. सदर पुस्तक प्रदर्शनात सुमारे ५० हजार विविध प्रकारची पुस्तके असून शहरातील व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी या प्रदर्शनास आवर्जून भेट द्यावी. असे आवाहन आयुक्त अजीज शेख यांनी केले आहे.