लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्यात चार तासांत संपली पुस्तके

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 07:04 AM2023-03-26T07:04:06+5:302023-03-26T07:04:36+5:30

लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्यात साहित्यिक, प्रकाशक यांची मांदियाळी दिसून आली.

Books sold out in four hours at Lokmat Sahitya Award ceremony in thane | लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्यात चार तासांत संपली पुस्तके

लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्यात चार तासांत संपली पुस्तके

googlenewsNext

ठाणे : लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्यात कथा, कादंबरी, कविता, समीक्षा, बालसाहित्य, आत्मचरित्र, अनुवाद, वैचारिक लेखन, मुखपृष्ठ, चित्रपटविषयक लेखन आदी विविध साहित्य प्रकारांतील सर्वोत्कृष्ट लेखनासाठीचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्कारप्राप्त पुस्तकांचे स्टॉल्स सभागृहाबाहेर लावण्यात आले होते. या पुस्तकांच्या लेखकांची स्वाक्षरी आणि सेल्फी यासह पुस्तक खरेदी करण्याची संधी उपस्थित रसिकांनी साधली. यामुळे प्रकाशकांच्या स्टॉलवर ठेवलेली सगळी पुस्तके अवघ्या चार तासांत विकली गेली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही न येणारा हा आगळावेगळा अनुभव यावेळी साहित्यिक, प्रकाशक आणि रसिकांनीही घेतला.  
 लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्यात साहित्यिक, प्रकाशक यांची मांदियाळी दिसून आली. पुरस्कारविजेत्या साहित्यिकांच्या पुरस्कारप्राप्त साहित्यकृतींचे स्टॉल गडकरी रंगायतनच्या आवारात लावण्यात आले होते. पुरस्कार सोहळ्याला आलेले रसिक व वाचक या स्टॉलवर रेंगाळत होते. पुस्तके  पाहत होते. लागलीच खरेदी करीत होते. लेखक व वाचक यांच्या भेटीचा योग लोकमतने उपलब्ध करून दिला होता. पुरस्कार सोहळा संपल्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्यासह नीरजा, दासू वैद्य आदींसह इतर साहित्यिकांनी त्यांची पुस्तके विक्रीकरिता ठेवलेल्या स्टॉलवर हजेरी लावली. पुस्तक खरेदी करणाऱ्यांच्या पुस्तकावर स्वाक्षऱ्या केल्या. वाचकांनी पुस्तकावर स्वाक्षऱ्या घेताना किंवा घेतल्यानंतर लेखकांसोबत मोबाइलमध्ये फोटो काढून घेतले. 

दिग्गज प्रकाशक प्रथमच एका मंचावर 

या सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानिमित्ताने मराठी साहित्य क्षेत्रातील दिग्गज प्रकाशक प्रथमच एकाच मंचावर आल्याचे पाहायला मिळाले. पॉप्युलर प्रकाशनाचे संस्थापक रामदास भटकळ, राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर, ग्रंथाली प्रकाशनाचे संस्थापक सदस्य दिनकर गांगल आणि मॅजेस्टिक प्रकाशनाचे अशोक कोठावळे हे यावेळी उपस्थित होते. या प्रत्येकानेच आपापल्या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून गेली तीन-चार दशके उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. हे सर्व जण एकाच वेळी एकत्र येण्याचा हा पहिलाच प्रसंग ठरला. 

Web Title: Books sold out in four hours at Lokmat Sahitya Award ceremony in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.