Maharashtra Election 2019: जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त; सीमा सुरक्षा, राज्य राखीव दलाच्या अतिरिक्त तुकड्याही तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 01:36 AM2019-10-21T01:36:04+5:302019-10-21T06:10:40+5:30
Maharashtra Election 2019: ठाणे आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ठाणे, भिवंडी, उल्हासनगर या तीन महापालिका तसेच अंबरनाथ आणि बदलापूर या नगर परिषदांचा समावेश आहे.
- जितेंद्र कालेकर
ठाणे : सोमवारी होत असलेली विधानसभा निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी संपूर्ण ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या तसेच ग्रामीण कार्यक्षेत्रात पोलिसांसह गृहरक्षक दलाचे जवान, केंद्रीय पोलीस, सीमा सुरक्षा दल आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या कंपन्याही तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ठाणे, भिवंडी, उल्हासनगर या तीन महापालिका तसेच अंबरनाथ आणि बदलापूर या नगर परिषदांचा समावेश आहे. यामध्ये ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळांत १४ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. याठिकाणी चार हजार १६२ मतदानकेंदे्र असून या सर्व ठिकाणी सोमवारी सकाळी ६ ते शेवटचे मतदानयंत्र स्ट्राँग रूमध्ये जाईपर्यंत हा बंदोबस्त राहणार आहे.
बंदोबस्तासाठी १२ उपायुक्तांच्या अधिपत्याखाली ३१ सहायक आयुक्त, १०७ पोलीस निरीक्षक, ४०६ सहायक पोलीस निरीक्षक तसेच उपनिरीक्षक, सहा हजार ९३ पोलीस कर्मचारी आणि १२९५ गृहरक्षक दलाच्या जवानांची नेमणूक आहे. यातील दोन हजार ९६२ पोलीस आणि १२०० गृहरक्षक दलाचे जवान हे मतदानकेंद्रांवर तैनात ठेवले आहेत. याशिवाय, नागालॅण्ड आणि सीमा सुरक्षा दलाच्या कंपन्या, राज्य राखीव दलाच्या पाच कंपन्या, दंगल नियंत्रण पथकाच्या तीन कंपन्या त्यात्या ठिकाणी तैनातीला आहेत. सहायक आयुक्त प्रत्येक मतदारसंघासाठी समन्वय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. कुठेही अनुचित प्रकार, पैसे वाटण्यासारखा किंवा कोणताही गैरप्रकार आढळल्यास तत्काळ कारवाई केली जाणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी चार ते पाच वाहने अशी १५० अतिरिक्त वाहने भाड्याने
घेतली आहेत.
ग्रामीण भागांत तीन हजार पोलीस तैनात
ठाणे ग्रामीण पोलीस दलाच्या कार्यक्षेत्रात विधानसभेचे नऊ मतदारसंघांचा समावेश आहे. याठिकाणी तीन केंद्रीय निमलष्करी दलाच्या तीन तुकड्यांसह सुमारे तीन हजार कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त याठिकाणी तैनात आहे. याठिकाणी सात उपअधीक्षक, २७ निरीक्षक, ११७ उपनिरीक्षक, १७५६ कर्मचारी आणि ८०० गृहरक्षक दलाची नेमणूक केली आहे. याठिकाणी १५१० बुथ असून ११० क्रिटिकल तर ११२ संवेदनशील केंद्रे असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी दिली.
प्रत्येक पाच मिनिटांमध्ये येणार पोलीस
यावेळी सेक्टर पेट्रोलिंग राबविण्यात येणार आहे. त्यामुळे दर पाच मिनिटांनी मतदानकेंद्रावर पोलिसांच्या गस्तीचे पथक मतदानकेंद्रावर पोहोचणार आहे. प्रत्येक वेळी येणाºया वेगवेगळ्या पथकांना मतदानकेंद्रांवरील हालचाली आणि कोणत्याही गैरकृत्याची माहिती मिळेल. तसेच काही आढळल्यास हे पथक तत्काळ कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.