घरत यांच्यासह दोघांना न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 05:48 AM2018-06-20T05:48:13+5:302018-06-20T05:48:13+5:30
लाचखोरीच्या प्रकरणात अटकेत असलेले कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत आणि लिपिक ललित आमरे व भूषण पाटील यांना मंगळवारी कल्याण न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.
कल्याण : लाचखोरीच्या प्रकरणात अटकेत असलेले कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत आणि लिपिक ललित आमरे व भूषण पाटील यांना मंगळवारी कल्याण न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर लगेच तिघांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. पण सरकारी वकिलांनी जामिनावर म्हणणे न मांडल्याने या अर्जावर बुधवारी सुनावणी होणार आहे.
सात मजली बेकायदा इमारतीवर कारवाई न करण्यासाठी आठ लाखांचा हप्ता स्वीकारताना घरत, आमरे आणि पाटील यांना १३ जूनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. त्यांना दोनदा पोलीस कोठडी मिळाली होती. मंगळवारी पुन्हा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्या. डी. एस. हातरोटे यांनी तिघांना पोलीस कोठडी न देता २ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर या तिघांनी जामिनासाठी अर्ज केला. मात्र, या अर्जावर बुधवारी सुनावणी होणार आहे.
घरत चौकशीदरम्यान सहकार्य करत नसल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयात केली आहे. घरत यांच्या मोबाइलमध्ये अनेक गोष्टी असून, त्यामुळे मोठा भ्रष्टाचार उघडकीस येऊ शकतो. आणखी काही जणांची नावेही उघडकीस येऊ शकतात, असा संशयही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने व्यक्त केला आहे.
पैशांची देवाणघेवाण सुरू असताना तक्रारदार आणि घरत यांच्यात झालेले संभाषण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रेकॉर्ड केले आहे. पुरावा म्हणून चारही आरोपींच्या आवाजाचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवायचे आहेत, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयात सांगितले.
>घरत यांच्या छातीत कळ
घरत आणि दोन लिपिकांना पोलीस व्हॅनमधून आधारवाडी कारागृहात नेण्यात येत होते. परंतु, अचानक घरत यांच्या छातीत कळ आली. तर, दोन्ही लिपिकांचा रक्तदाब वाढला. त्यामुळे पोलिसांनी तिघांनाही महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात हलविले आहे.
तेथील डॉक्टरांनी तिघांची वैद्यकीय तपासणी सुरू केली आहे. त्यांच्यासाठी फिजीशीयनला पाचारण करण्यात येणार आहे. तपासणीनतर त्यांना खरोखरच त्रास झाला आहे की, त्यांनी कारागृहात जाण्यापासून वाचण्यासाठी आजारपणाचा बनाव केला आहे, हे उघड होणार आहे.