कर्ज देण्याच्या नावाखाली छोट्या व्यापा-यांना गंडा घालणा-या दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2017 11:52 PM2017-10-06T23:52:40+5:302017-10-06T23:52:52+5:30
कर्ज देण्याच्या नावाखाली लहान व्यापा-यांना गंडा घालणा-या अतुल शर्मा ऊर्फ अनयाल (३०) आणि भरत जोशी (५५, रा. दोघेही वर्तकनगर, ठाणे) या दुकलीला गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-५ वागळे इस्टेट पथकाने अटक केली आहे.
ठाणे : कर्ज देण्याच्या नावाखाली लहान व्यापा-यांना गंडा घालणा-या अतुल शर्मा ऊर्फ अनयाल (३०) आणि भरत जोशी (५५, रा. दोघेही वर्तकनगर, ठाणे) या दुकलीला गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-५ वागळे इस्टेट पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून असे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
ठाण्यातील एका पानटपरीचालकाला या जोडगोळीने ९० हजारांचा गंडा घातल्याचा गुन्हा वर्तकनगर पोलीस ठाण्यात २७ सप्टेंबर २०१७ रोजी दाखल झाला. त्याचा तपास वर्तकनगर पोलिसांबरोबर गुन्हे अन्वेषण विभागाकडूनही सुरू होता. युनिट-५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणावरे, उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे, हवालदार देविदास जाधव, नाईक दिलीप शिंदे, राजकुमार पाटील, राजेंद्र गायकवाड आदींनी मिळालेल्या खब-याच्या तसेच मोबाइल लोकेशन टॉवरच्या आधारे आधी जोशीला किसननगर भागातून अटक केली. त्यापाठोपाठ अतुल याचीही धरपकड करण्यात आली. दोघांनाही आता सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्यांनी आतापर्यंत नौपाडा, वर्तकनगर, श्रीनगर या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रांतील २० ते २५ छोट्या दुकानदारांना गाठून त्यांच्याकडून आठ ते १० लाख रुपये उकळल्याची माहिती तपासात समोर येत आहे. या दोघांनाही आता वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून वर्तकनगर पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.
असे उकळायचे पैसे...
पानटपरी चालक किंवा छोटे दुकानदार यांना कर्ज मिळवून देण्याचे अमिष दाखवून अतुल अशी गि-हाईके शोधायचा. त्यांच्याकडून तीन धनादेश, पॅन कार्ड आणि आधार कार्ड घ्यायचा. त्यातील दोन धनादेश कॅन्सल केले जायचे. तर एक धनादेश मात्र तसाच ठेवला जायचा. त्याचा साथीदार जोशी मात्र संबंधित कर्जदाराच्या खात्यातील बॅलन्सची माहिती काढून स्वत:चे पॅनकार्ड दाखवून कॅन्सल न केलेला चेक वटवून पैसे काढत होता. दरम्यान, कर्जदाराला मात्र अशी बतावणी केली जायची की, ज्याला कर्ज काढण्यासाठी पैसे दिले आहेत, तो काम करीत नाही. अशाच प्रकारे ही दुक्कल व्यापाºयांकडून पैसे उकळत होती. एका टपरीचालकाने दिलेल्या तक्रारीनंतर हा प्रकार उघड झाला.