ठाण्यात बिबट्याचे कातडे विकणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 01:25 AM2018-04-17T01:25:32+5:302018-04-17T01:25:32+5:30
बिबट्याचे कातडे विकण्यासाठी ठाण्यात आलेल्या मध्य प्रदेशातील दोन आरोपींना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने रविवारी अटक केली. आरोपींकडून बिबट्याचे संपूर्ण कातडे हस्तगत करण्यात आले.
ठाणे : बिबट्याचे कातडे विकण्यासाठी ठाण्यात आलेल्या मध्य प्रदेशातील दोन आरोपींना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने रविवारी अटक केली. आरोपींकडून बिबट्याचे संपूर्ण कातडे हस्तगत करण्यात आले.
साकेत रोडवर दोन इसम बिबट्याचे कातडे विकण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१ चे सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांना रविवारी दुपारी मिळाली. त्यानुसार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अभिषेक त्रिमुखे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या एका पथकाने सापळा रचून आरोपींना साकेत कॉम्प्लेक्सजवळील महालक्ष्मी मंदिराजवळून अटक केली. आरोपींची झडती घेतली असता, त्याच्याजवळील बॅगेमध्ये साडीत गुंडाळलेले बिबट्याचे कातडे आढळले. हे कातडे सुकवलेले असून त्याला नखेही आहेत. अंदाजे अडीच-तीन वर्षे वयाच्या बिबट्याचे हे कातडे असावे, असा अंदाज पोलिसांनी पत्रकार परिषदेत वर्तवला. आरोपींची चौकशी केली असता ते कातड्याची विक्री १० लाख रुपयांमध्ये करणार असल्याची माहिती उघडकीस आली. किस्मतलाल बरखा मराबी (३०) आणि कोरचा बरट मराबी (२५) ही आरोपींची नावे असून दोघेही मध्य प्रदेशातील कटणी जिल्ह्यातील रिठी तालुक्याच्या कुडो गावचे रहिवासी आहेत. दोघेही जंगल परिसरात राहणारे असून मजुरी हा त्यांचा व्यवसाय असल्याची माहिती उपायुक्त त्रिमुखे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलिसांनी ठाण्याच्या वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागास कातडे दाखवले असता, त्यांनी ते बिबट्याचेच असल्याचे सांगितले. राबोडी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ चे कलम ९, ३९, ४८ (अ), ४९ आणि ५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बागुल करत आहेत. मध्य प्रदेशातील एका व्यक्तीने या बिबट्याची शिकार केली होती. त्याच्याजवळून हे कातडे विकत घेतल्याची कबुली आरोपींनी पोलिसांकडे दिली. मात्र, त्यांच्या माहितीतील तथ्य तपासून पाहिले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.