दोन्ही काँग्रेसची आघाडी?

By admin | Published: May 29, 2017 06:10 AM2017-05-29T06:10:53+5:302017-05-29T06:10:53+5:30

मीरा-भार्इंदरमध्ये मोठी गळती लागल्याने पालिका निवडणुकीत आघाडी करण्याची तयारी दोन्ही काँग्रेसमध्ये सुरू झाली आहे

Both the Congress lead? | दोन्ही काँग्रेसची आघाडी?

दोन्ही काँग्रेसची आघाडी?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मीरा-भार्इंदरमध्ये मोठी गळती लागल्याने पालिका निवडणुकीत आघाडी करण्याची तयारी दोन्ही काँग्रेसमध्ये सुरू झाली आहे. आघाडी झाल्यास महापालिका निवडणुकीत एकत्र लढण्याची ही दोन्ही काँग्रेसची पहिलीच वेळ असेल. आघाडी झाल्यास काँग्रेस मोठ्या भावाची भूमिका बजावणार, हे निश्चित. दरम्यान, दोन्ही काँग्रेसने इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागवले आहेत. सध्याचे प्राबल्य असलेले प्रभाग व उमेदवारांची यादी तयार झाल्यावर त्यातून निवडून येण्याच्या क्षमतेप्रमाणे जागावाटप होण्याचे संकेत आहेत.
महापालिकेची पहिली निवडणूक २००२ मध्ये झाली होती. त्यावेळी दोन्ही काँग्रेसमध्ये बहुतांश मैत्रीपूर्ण लढतच झाली होती. त्यानंतरही २००७ व २०१२ च्या पालिका निवडणुकीतही दोन्ही काँग्रेस स्वतंत्र लढल्या होत्या. पण, निवडणुकीनंतर मात्र २००७ मध्ये पहिल्या अडीच वर्षांसाठी झालेल्या महापौर व उपमहापौर निवडणुकीचा अपवाद वगळता दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी झाली होती.
२०१२ च्या निवडणुकीत काँग्रेसचे २०, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ नगरसेवक निवडून आले होते. परंतु, राष्ट्रवादीचे स्थानिक सर्वेसर्वा माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा हे आता समर्थक नगरसेवक-पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आधीच राष्ट्रवादीचे डझनभर नगरसेवक शिवसेना व भाजपात गेले आहेत. जिल्हाध्यक्ष मोहन पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारीही बाहेर पडले आहेत. त्यामुळे १५ वर्षे सत्तेत असणारी राष्ट्रवादी काँग्रेस शहरात नावाला उरली आहे.
काँग्रेसची अवस्थाही शहरात वेगळी नाही. माजी आ. मुझफ्फर हुसेन यांच्याकडून डावलले जाणे वा कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त करत अनेक ज्येष्ठांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. काँग्रेसच्या विद्यमान ९ नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपा-सेनेत दाखल झाले.
शहरात सध्या भाजपा विरुद्ध शिवसेना अशीच लढत रंगणार असल्याचे वातावरण आहे. त्यातच, ४ नगरसेवकांचा एक प्रभाग असल्याने दोन्ही काँग्रेसला येणारी पालिका निवडणूक फारच अवघड ठरणार आहे. त्या अनुषंगाने दोन्ही काँग्रेसला शहरात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आघाडीशिवाय पर्याय नाही.

काँग्रेस आघाडीने मंजूर केलेली विकासाची कामेच आज शहरात सुरू आहेत. शहरातील सत्ताधारी भाजपाच्या भ्रष्ट व दडपशाही कारभाराला नागरिक कंटाळले आहेत. शहरहितासाठी दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडीची चर्चा सुरू आहे. उमेदवारांची यादी आल्यानंतर जागावाटपाबाबत चर्चा करता येईल. - अनिल सावंत, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
शहर पुन्हा विकासाच्या प्रगतीपथावर न्यायचे असेल, तर दोन्ही काँग्रेसला आताच्या परिस्थितीत आघाडी करून निवडणूक लढवण्याशिवाय पर्याय नाही. आमची काँग्रेससोबत आघाडीची बोलणी सुरू झाली असून दोन्ही पक्षांचे नेते योग्य निर्णय घेतील.
- जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
वरिष्ठ स्तरावर अजून आघाडीबाबत चर्चा झालेली नाही. पण, स्थानिक पातळीवर जिल्हाध्यक्षांकडून इच्छुक उमेदवारांची यादी आल्यावर आघाडीबाबत विचार करून निर्णय घेतला जाईल.
- मुझफ्फर हुसेन, माजी आमदार

च्काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल सावंत व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे.
च्आघाडीसाठी सध्या ज्या पक्षाचा जास्त प्रभाव आहे, असे प्रभाग तसेच इच्छुक उमेदवारांची यादी तयार करून त्यातील निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार ठरवून जागावाटपाचे सूत्र ठरवले जाण्याची शक्यता आहे.

च्४ नगरसेवकांचा एक प्रभाग असल्याने ही निवडणूक दोन्ही काँग्रेसला कठीण जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना आघाडीशिवाय पर्याय राहिलेला नाही.

Web Title: Both the Congress lead?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.