धक्कादायक! साक्ष बदलण्यासाठी दोन्ही हात तोडले; शिंदेसेनेच्या नेत्यांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 06:04 AM2024-08-30T06:04:15+5:302024-08-30T06:04:47+5:30

मारहाण करणाऱ्या व्यक्ती या शिंदे गटाचे पदाधिकारी असून या गुन्ह्याच्या नोंदीत फेरफार करण्यात आल्याचा आरोपही जखमीने केला आहे.

Both hands were broken to change the testimony | धक्कादायक! साक्ष बदलण्यासाठी दोन्ही हात तोडले; शिंदेसेनेच्या नेत्यांविरोधात गुन्हा दाखल

धक्कादायक! साक्ष बदलण्यासाठी दोन्ही हात तोडले; शिंदेसेनेच्या नेत्यांविरोधात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क, अंबरनाथ : ‘माझ्या विरोधातील केसमधील साक्ष बदल; अन्यथा जिवे मारू’ असे म्हणत एकाला जबर मारहाण करून त्याचे दोन्ही हात तोडल्याप्रकरणी अंबरनाथमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमानुष मारहाण करणाऱ्या व्यक्ती या शिंदे गटाचे पदाधिकारी असून या गुन्ह्याच्या नोंदीत फेरफार करण्यात आल्याचा आरोपही जखमीने केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबरनाथमधील विनायक पिल्ले यांचे मित्र भरत पाटील यांच्यावर काही वर्षांपूर्वी माजी नगरसेवक लेनिन मुक्कू यांच्याकडून जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणात पिल्ले हे मुख्य साक्षीदार आहेत. या प्रकरणाची २० ऑगस्टला कोर्टात सुनावणी होती. या तारखेला पिल्ले यांनी जाऊ नये, यासाठी मुक्कू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना मारहाण केली.

रक्षाबंधनाच्या दिवशी सायंकाळी बहिणीकडून राखी बांधून परत येत असताना पिल्ले यांना वांद्रापाडा परिसरात गुड्डू नावाच्या तरुणाने थांबवले आणि तेथून चिंचपाडा परिसरातील शिंदे गटाचे पदाधिकारी विकास सोमेश्वर यांच्या कार्यालयात नेले.

जबर मारहाण केली
विकास सोमेश्वर आणि मुक्कू यांच्यासह काही जणांनी त्यांना १५ ते २० मिनिटे जबर मारहाण केली. त्यानंतर अंबरनाथच्या ऑर्डनन्स इस्टेट परिसरातील मैदानात नेऊन तिथेही हातपाय बांधून तब्बल तासभर त्यांना पुन्हा बेदम मारहाण केली. आणि मरणासन्न अवस्थेत तिथेच सोडून देत शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तेथून पसार झाले, असा आरोप पिल्ले यांनी केला आहे.

उपचार सुरू 
पिल्ले यांच्यावर सध्या भिवपुरी इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून  तिथल्या डॉक्टरांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा गुन्हा अंबरनाथ पश्चिम पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणात गुन्ह्याच्या नोंदीमध्ये फेरफार केला जात असल्याचा आरोप आता पिल्ले यांनी केला आहे. याबाबत अंबरनाथ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मात्र प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

Web Title: Both hands were broken to change the testimony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.