खवल्या मांजराची ४० लाखांत तस्करी करणाऱ्या दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 06:30 AM2019-01-09T06:30:56+5:302019-01-09T06:31:20+5:30
परदेशात तस्करी : ठाणे मध्यवर्ती शोध पथकाची कामगिरी
ठाणे : दुर्मीळ प्रजातीच्या खवले मांजराची ४० लाखांमध्ये विक्री करण्याच्या तयारीमध्ये असलेल्या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध कक्षाच्या पथकाने मंगळवारी जेरबंद केले. सागर पवार (३३, फलपाडा, विरार, जि. पालघर ) आणि अब्दुल महामृत (५४, रा. साई, जि. रायगड) अशी दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून खवल्या मांजर या वन्यजीवाची सुटका करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दुर्मिळ खवल्या मांजराची तस्करी करण्यासाठी सागर आणि अब्दुल येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार शरद तावडे यांना मिळाली होती. त्या आधारे ठाण्याच्या वनक्षेत्रपालांशी पत्रव्यवहार करून वन विभागाचे कर्मचारी घेऊन मंगळवारी दहिसर मुंब्रा या भागात अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविण पवार, उपायुक्त देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांच्या पथकाने सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील एका प्लास्टिकच्या गोणपाटातून नामशेष होत चाललेले संरक्षित वन्यजीव खवले मांजर (इंडियन पॅन्गोलिन) हस्तगत केले. त्यांनी ते दहा लाखांमध्ये खरेदी केले होते. त्याची ते परदेशामध्ये ४० लाखांमध्ये विक्री करणार होते, त्यापूर्वीच ठाणे पोलिसांनी त्यांना शिताफीने पकडले. त्यांच्याशी निगडीत आणखी कोणती टोळी आहे का? ते याची विक्री कोणाला करणार होते? आदींबाबत चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यापूर्वीही झाली होती तस्करी
यापूर्वीही ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने खवल्या मांजराची तस्करी करण्यासाठी आलेल्या देवजी सावंत, संजय भोसले आणि रामदास पाटील या तिघांना ठाण्यातील साकेतकडून बाळकूमकडे जाणाºया रस्त्यावर १२ आॅक्टोंबर २०१८ रोजी अटक केली. त्यांच्याकडूनही खवले मांजर हस्तगत केले होते.