‘ते’ दोघे पुन्हा महापालिकेच्या सेवेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 12:54 AM2019-05-30T00:54:05+5:302019-05-30T00:54:14+5:30
एकीकडे केडीएमसीत लाचखोरीचा सिलसिला सुरू असताना दुसरीकडे लाचखोरीच्या तसेच अन्य प्रकरणांत निलंबित होऊन एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे,
कल्याण : एकीकडे केडीएमसीत लाचखोरीचा सिलसिला सुरू असताना दुसरीकडे लाचखोरीच्या तसेच अन्य प्रकरणांत निलंबित होऊन एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे, अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याबाबत फेरविचार करणारी निलंबन आढावा समितीची बैठक मंगळवारी मुख्यालयात पार पडली. यामध्ये राजन ननावरे आणि श्रीपत मढवी यांचे निलंबन रद्द करून त्यांना महापालिकेच्या सेवेत रुजू करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
लाचखोरीप्रकरणी निलंबित झाल्यानंतर पहिले तीन महिने ५० टक्के, त्यानंतर ७५ टक्के वेतन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुरू असते. त्यात नियमाप्रमाणे लाचखोरीमध्ये निलंबित झालेल्यास न्यायालयात अभियोग दाखल झाल्यानंतर एक वर्षाने पुन्हा सेवेत घेण्याबाबत विचार केला जातो. त्यासाठी निलंबन आढावा समिती स्थापन केली आहे. अन्य प्रकरणांमध्ये निलंबित असलेल्यांचाही निर्णय ही समिती घेते. या निलंबन आढावा समितीत आयुक्त, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त, सहायक आयुक्त, लाचलुचपतच्या अधिकाºयांसह अन्य अधिकाºयांचा समावेश आहे. दर सहा महिन्यांनी निलंबन आढावा समितीची बैठक घेणे क्रमप्राप्त असते. केडीएमसीत मात्र सहा महिन्यांहून अधिक काळ झाला तरी समितीची बैठक झालेली नव्हती. आचारसंहिता संपल्यानंतर २८ मे चा मुहूर्त बैठकीसाठी काढला होता. त्याप्रमाणे मंगळवारी बैठक पार पडली. सध्या महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत, प्रभागक्षेत्र अधिकारी गणेश बोराडे, स्वाती गरूड, शरद पाटील, परिवहन उपक्र मातील अधीक्षक राजन ननावरे या अधिकाºयांसह काही कर्मचारी लाचखोरीत निलंबित आहेत. यातील काहींना निलंबित होऊन दीड वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. त्यामुळे समितीची बैठक कधी लागते, याकडे निलंबित अधिकारी व कर्मचाºयांचे लक्ष लागले होते.
मंगळवारी लाचखोरीसह अन्य प्रकरणांत निलंबित १४ जणांचे प्रस्ताव बैठकीत मांडले होते. ज्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आलेली नाही, अशांची चौकशी सुरू करावी आणि त्यांचे प्रस्ताव पुढील बैठकीत ठेवावेत, अशा सूचना आयुक्त गोविंद बोडके यांनी दिल्या. तर विभागीय चौकशी झालेले केडीएमटीतील वरिष्ठ लिपिक राजन ननावरे यांच्यासह कामगार श्रीपत मढवी यांचे निलंबन संपुष्टात आणून त्यांना महापालिका सेवेत रुजू करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
>यासाठी झाले होते निलंबन
केडीएमटी उपक्रमातील ननावरे यांनी २७ डिसेंबर २०१६ रोजी तिकीट घोटाळ्याचा ठपका ठेवलेल्या वाहकास कामावर परत घेण्याची काढलेली आॅर्डर देण्यासाठी सात हजारांची लाच मागितली होती. ती घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा लावून ननावरे यांना अटक केली होती. तर, कामगार श्रीपत मढवी हा एका मारामारी प्रकरणात फौजदारी कारवाई झाल्याप्रकरणी निलंबित होता. त्यालाही सेवेत घेण्याचा निर्णय निलंबन आढावा समितीने घेतला आहे.