नऊ लाखांच्या जबरी चोरीप्रकरणी दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 10:08 PM2017-10-15T22:08:57+5:302017-10-15T22:09:15+5:30
इंदिरानगर येथील एका व्यावसायिकाकडून कोपरी ब्रिज येथे नऊ लाखांची रोकड लुटणाºया संतोष सिंह आणि रवींद्र मोरे या दोघांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने अटक केली आहे
ठाणे : इंदिरानगर येथील एका व्यावसायिकाकडून कोपरी ब्रिज येथे नऊ लाखांची रोकड लुटणाºया संतोष सिंह आणि रवींद्र मोरे या दोघांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने अटक केली आहे. त्यांच्याकडून १५ हजारांच्या रोकडसह ४६ हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे.
इंदिरानगर येथे फरीद शेख यांचा ‘रॉयल चिकन सेंटर’ या नावाने व्यवसाय आहे. ते या दुकानात व्यवस्थापक म्हणून कार्यरत असून ठरावीक दिवशी ते या व्यवसायातील रोकड त्यांच्या दादर येथील मुख्य कार्यालयात नेत असतात. ९ आॅक्टोबर रोजी एका दुचाकीवरून दुकानातील नऊ लाखांची रोकड घेऊन ते जात होते. त्या वेळी संतोष याच्यासह चौघांनी त्याचा पाठलाग करून कोपरी ब्रिजजवळ त्यांना अडवून त्यांच्याकडील नऊ लाखांची रोकड जबरीने हिसकावून पलायन केले होते. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. कोपरी पोलिसांबरोबर गुन्हे अन्वेषण विभागाकडूनही या प्रकरणाचा तपास सुरू होता. या लुटीतील एक संशयित संतोष हा इंदिरानगरनाका येथे येणार असल्याची माहिती युनिट-५ चे पोलीस नाईक दिलीप शिंदे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे, नाईक शिंदे, राजू क्षत्रिय आदींच्या पथकाने इंदिरानगर भागात सापळा लावून १३ आॅक्टोबर रोजी रात्री संतोषला अटक केली. त्याला ‘बोलते’ केल्यानंतर त्याने या जबरी चोरीची कबुली दिली.
चौकशीत त्याने दिलेल्या माहितीनुसार रवींद्र या त्याच्या अन्य एका साथीदाराला रबाले परिसरातून या पथकाने अटक केली. दोघांनीही या लुटीची कबुली दिली असून, रवींद्र याच्याकडून १० हजार रोख, मोटारसायकल तर संतोषकडून पाच हजारांची रोकड आणि दोन मोबाइल असा ४६ हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे. त्यांच्या आणखी दोन साथीदारांचाही शोध घेण्यात आहे. यातील संतोषने अशा प्रकारे कॅश मुंबईत जात असल्याची ‘टीप’ त्याच्या अन्य तीन साथीदारांना दिली. याच टीपच्या आधारावर त्याच्या इतर तीन साथीदारांनी ही लूट केल्याचे तपासात उघड झाले. दोघांनाही १६ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. कोपरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक एम.डी. जाधव हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.