मुंब्य्रातून पिस्तूल आणि गावठी कट्ट्यासह दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 10:36 PM2019-01-25T22:36:35+5:302019-01-25T22:40:20+5:30
प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अतिदक्षतेचा इशारा दिलेला असतांनाच ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने एकाला मुंब्य्रातून तर दुसऱ्याला झाँसी (उत्तरप्रदेश) येथून अटक करुन त्यांच्याकडून दोन पिस्टल आणि एक गावठी कट्टा अशी सुमारे अडीच लाखांची शस्त्रसामुग्री जप्त केली आहे.
ठाणे : बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणा-या रोहित भैय्यालाल गुप्ता (रा. मुंब्रा) आणि मुन्ना उर्फ मोहमद इक्राम शेख (रा. झॉसी, उत्तरप्रदेश) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन पिस्टल, एक गावठी कट्टा, मॅगझीन आणि काडतुस अशी शस्त्रास्त्रे हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.
आगामी लोकसभा निवडणूक तसेच २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर घातपाती कारवाया होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी विनापरवाना शस्त्र बाळगणाºया गुन्हेगारांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते. याच अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांच्या पथकाने १९ जानेवारी रोजी रोहीत गुप्ता याला मुंब्रा परिसरातील साईसदन इमारतीच्या मैदानात, दिवा पश्चिम भागातून अटक केली. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस हस्तगत केली. त्याला २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. सखोल चौकशीमध्ये त्याने उत्तरप्रदेशातील झाँसी येथून हा गावठी कट्टा आणल्याची माहिती उघड झाली. याच माहितीच्या आधारे झाँसी येथून मुन्ना शेख यालाही या पथकाने अटक केली. त्याच्याकडून दोन लाख दहा हजारांची दोन पिस्तूल आणि मॅगझिन अशी शस्त्रास्त्रे हस्तगत केल्याची माहिती देवराज यांनी दिली. त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का? या सर्व बाबींचा तपास करण्यात येत आहे. मुन्ना शेख हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याला यापूर्वीही ठाणे रेल्वे पोलिसांवर हल्ला केल्याच्या प्रकरणात अटक झाली होती, असेही त्यांनी सांगितले.