कळव्याच्या उच्चभ्रू वस्तीमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेसह दोघींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 09:53 PM2018-11-01T21:53:47+5:302018-11-01T22:00:28+5:30
पैशाचे अमिष दाखवून जाळयात ओढल्यानंतर गरजू महिलांना शरीरविक्रयासाठी लावणाºया प्रिया जाधवा या दलाल महिलेसह तिला घर भाडयाने देणा-या रेखा अरोरा अशा दोन महिलांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने ३१ आॅक्टोबर रोजी अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: उच्चभ्रू वस्तीमध्ये सेक्स रॅकेट चालविणारी दलाल प्रिया जाधव (१९) आणि त्यासाठी घर भाडयाने देणारी रेखा अरोरा (६०) या दोघींना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने बुधवारी रात्री अटक केली. त्यांच्या तावडीतून दोन पिडीत महिलांची सुटकाही केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्रिया नामक महिला फोन केल्यानंतर तीन हजार रुपयांच्या मोबदल्यात शरीरविक्रयासाठी महिलांना पाठविते, अशी माहिती ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे कळव्यातील चिंचपाडा भागातील मातोश्री रमाबाई आंबेडकर बिंल्डींग पहिला मजला याठिकाणी ३१ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वा. च्या सुमारास अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपायुक्त दिपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली दौंडकर यांच्यासह जमादार राजू महाले, हवालदार अविनाश बाबरेकर, विजय पवार, लक्ष्मण भोईर, अक्षदा साळवी, निशा कारंडे, अंशिता मिसाळ आणि वर्षा माने आदींच्या पथकाने कळवा पोलिसांसह संयुक्तरित्या केलेल्या धाडसत्रात प्रिया आणि रेखा या दोन्ही महिलांना ताब्यात घेतले. दोन महिलांकडून पैशाच्या मोबदल्यामध्ये शरीरविक्रयाचा व्यवसाय करतांना त्या आढळल्या. महिलेची मागणी करणाºया ग्राहकांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी रेखा हिच्या घरातील किचनचा वापर केला जात होता. कळवा पोलीस ठाण्यात या दोघींंविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघींनाही बुधवारी रात्री ११.४० वा. च्या सुमारास अटक करण्यात आली. त्यांच्या तावडीतून दोन पिडीत महिलांचीही सुटका करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कळवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक इरशाद सय्यद हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.