ठाण्यात पाच ठिकाणी बॉटल क्रशिंग प्लान्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 11:43 PM2018-10-13T23:43:03+5:302018-10-13T23:43:41+5:30
लवकरच शुभारंभ : अडीच हजार बाटल्यांवर प्रक्रिया
- नारायण जाधव
ठाणे : नावीन्याचा ध्यास घेऊन नेहमीच नवनवीन प्रयोग करून विविध उपक्रम राबवून आपल्या नावाची पताका सर्वदूर पसरवणाऱ्या ठाणे महापालिकेने आता शहरात प्रायोगिक तत्त्वावर पाच ठिकाणी प्लास्टिक बॉटल क्रशिंग प्लान्ट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे, कळवा यासारख्या रेल्वेस्थानकांचा परिसर, उपवनसारखी गर्दी होणारी मनोरंजनाची ठिकाणे, प्रमुख बाजारपेठांना यासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान यांनी लोकमतला सांगितले.
राज्य शासनाने प्लास्टिकबंदी केल्यानंतर त्याची ठाणे महापालिका काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी पुढाकार घेऊन प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यासाठी व्यापाºयांवर धाडी टाकण्यासह प्रभाग कार्यालयांत प्लास्टिक संकलन केंद्रेही उभारली होती. मात्र, शासनाने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली असली तरी विविध प्लास्टिक बाटल्यांवर ती घातली नाही. ठाणे शहरात विविध मॉल, सिनेमागृहे, खाऊगल्ल्यांसह बस आणि रेल्वेस्थानकांत नागरिकांकडून कोल्ड्रिंक आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने मिनरल पाण्याला प्राधान्य देऊन रोज हजारो प्लास्टिक बाटल्यांमधील पाणी विकत घेतले जाते.
अशी असणार योजना
सुरुवातीला पाच ठिकाणी हे मशीन/प्लान्ट उभारण्यात येणार आहेत. एका मशीनमध्ये दररोज साधारण ५०० प्रमाणे अडिच हजार बाटल्या क्रश होतील, असा अंदाज आहे. बसस्थानके, रेल्वेस्टेशनसह मॉल, बाजारपेठा किंवा मनोरंजनाच्या ठिकाणी येजा करणाºया नागरिकांनी पाणी पिऊन झाल्यावर रिकामी प्लास्टिक बाटली या मशीनमध्ये टाकायची आहे.
ती टाकल्यावर त्यांना एक कुपन मिळेल, तर बाटल्या क्रश झाल्यावर निर्माण होणारे १० किेलो फलेक्स संबंधित कंपन्यांना देऊन त्याचा पुनर्वापर करता येईल. यातून जो मोबदला मिळेल, त्यातून त्या कुपनधारकाला रिवॉर्ड दिला जाईल, अशीही योजना राहणार आहे. सध्या महापालिकेने इच्छुकांकडून स्वारस्य अभिकर्ता प्रस्ताव मागवले आहेत.
सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर ती पाच ठिकाणी राबवण्यात येणार असून तेथील यशापयश बघून उर्वरित शहरांत ठिकठिकाणी हे मशीन बसवून ठाणे शहरातून प्लास्टिकचे समूळ उच्चाटन करण्यात येणार आहे.