VIDEO : बिबट्याच्या डोक्यात अडकली बाटली; ३६ तासांपासून शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 12:09 PM2022-02-15T12:09:03+5:302022-02-15T12:13:29+5:30
बिबट्याचा हा बछडा साधारण एक वर्षाचा असून गोरेगाव परिसरात रविवारी रात्री तो पाणी पिण्यासाठी आला होता. मात्र यावेळी एका पाण्याच्या कॅनमध्ये त्याचे डोके अडकले.
अंबरनाथ : बिबट्याच्या डोक्यात बाटली अडकल्याचा प्रकार ठाणे जिल्ह्यातील बदलापूरजवळ असलेल्या गोरेगावमध्ये समोर आला आहे. गेल्या ३६ तासांपासून बिबट्याच्या या बछड्याचा शोध घेतला जात आहे. डोक्यात बाटली अडकल्याने या पिल्लाला काहीही खाणे अशक्य झाले आहे. यामुळे त्याचा जीव धोक्यात आला आहे.
बिबट्याचा हा बछडा साधारण एक वर्षाचा असून गोरेगाव परिसरात रविवारी रात्री तो पाणी पिण्यासाठी आला होता. मात्र यावेळी एका पाण्याच्या कॅनमध्ये त्याचे डोके अडकले. त्यामुळे ही कॅन घेऊन हे पिल्लू फिरत असतानाच एका पर्यटकाला दिसले. यामुळे त्याने त्याचा व्हिडीओ काढला. यानंतर या व्हिडिओच्या आधारे या पिल्लाचा रविवारी रात्रीपासून कसून शोध घेतला जात आहे.
वनविभागाचे अधिकारी कर्मचारी, एनजीओ, प्राणीमित्र संघटना असा मोठा फौजफाटा या बिबट्याच्या पिल्लाला शोधण्यासाठी मेहनत घेत आहे. या पिल्लाच्या पायांचे ठसे आढळले असले, तरी पिल्लू मात्र आढळून आलेले नाही. रात्रीपासून या पिल्लाच्या डोक्यात कॅन अडकल्याने ते उपाशी आणि तहानलेले असणार आहे. त्यामुळे त्याला लवकरात लवकर शोधण्याचे आव्हान वनविभागासमोर आहे.
बिबट्याच्या डोक्यात अडकली बाटली; ३६ तासांपासून शोध सुरू#leopard#badalapur#ForestDepartmentpic.twitter.com/Zn66XA8Tm5
— Lokmat (@lokmat) February 15, 2022
बदलापूर आणि वांगणी परिसरात यापूर्वीही बिबट्याचा वावर आढळून आला होता. काही वर्षांपूर्वी मृत अवस्थेत एका बिबट्याचा बछडा आढळत होता. आता पुन्हा एका बिबट्याच्या पिल्ल्याचा जीव धोक्यात असल्याने त्याचा जीव वाचवण्यासाठी वन विभाग शर्तीचे प्रयत्न करीत आहे.