ठाण्यातील पादचारी पुलावर दारूच्या बाटल्या, कचरा, गर्दुल्लेही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:36 AM2021-03-15T04:36:55+5:302021-03-15T04:36:55+5:30
ठाणे : शहरात उभारलेल्या पादचारी पुलांचा उपयोग होत नसल्याच्या भाजपच्या मुद्द्यावर शिवसेनेकडून टीका केली जात आहे. त्याचवेळी शहरातील काही ...
ठाणे : शहरात उभारलेल्या पादचारी पुलांचा उपयोग होत नसल्याच्या भाजपच्या मुद्द्यावर शिवसेनेकडून टीका केली जात आहे. त्याचवेळी शहरातील काही पादचारी पुलांवर दारुच्या रिकाम्या बाटल्या, कचरा आणि गर्दुल्ल्यांचा वावर असल्याचे विदारक चित्र उघड झाले आहे. भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी शनिवारी दौरा करून जुने पासपोर्ट ऑफीस, रहेजा, तत्वज्ञान विद्यापीठ आणि कोपरी पुलाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले. पादचारी पुलावर दारूच्या बाटल्या आणि कचरा पसरला आहे. काही ठिकाणी टांगत्या केबलमुळे पादचारीही फिरकत नाहीत. या पादचारी पुलावर लाखो रुपये वाया गेल्याचे शिवसैनिकांनी आवर्जून पाहावे, असा टोला डुंबरे यांनी लगावला आहे.
वागळे इस्टेट येथील पादचारी पुलाचा नागरिकांकडून वापर केला जात नाही. त्याचा गर्दुल्ले, मद्यपींकडून वापर होत आहे. या पुलाची डुंबरे यांनी पाहणी केली. त्यावेळी पुलावर दारूच्या रिकाम्या बाटल्या, कचरा आढळला. इतकेच नव्हे तर एक गर्दुल्लाही झोपलेला आढळला. अनेक ठिकाणी मार्गातच केबल लटकलेल्या होत्या. या पुलाची दररोज साफसफाईही केली जात नसल्याचाही त्यांनी आरोप केला आहे. अशा परिस्थितीत नव्या पुलांचा अट्टाहास शिवसेनेकडून का धरला जात आहे, असा सवाल डुंबरे यांनी केला.