निवडणूक आयोगाने अंबरनाथमध्ये एका प्रभागाची हद्द बदलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 01:07 AM2020-10-08T01:07:17+5:302020-10-08T01:07:21+5:30
मतदाराने घेतली होती हरकत
अंबरनाथ : राज्य निवडणूक आयोगाने अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रभागरचनेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एका प्रभागाच्या रचनेत चुकीच्या पद्धतीने बदल करण्यात आला होता. त्या बदलाबाबत एका मतदाराने हरकत घेतली होती. त्या हरकतीवर सुनावणीही घेण्यात आली होती. अखेर, निवडणूक आयोगाने या हरकतीबाबत निर्णय देत पालिकेच्या प्रभाग क्रमांक २२ मधील प्रभागरचनेवर घेतलेली हरकत मान्य केली आहे.
अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक एप्रिल महिन्यात होणे अपेक्षित होते. मार्च महिन्यात प्रभागरचना निश्चित करण्यात आली होती. मात्र, प्रभागरचनेमध्ये प्रभाग क्रमांक-२२ मध्ये काही भाग वगळण्यात आल्याने त्यासंदर्भात स्थानिक रहिवासी आणि इच्छुक उमेदवार किरण राठोड यांनी निवडणूक आयोगाकडे हरकत नोंदविली होती. त्याचदरम्यान लॉकडाऊन लागल्याने निवडणूक आणि निवडणुकीची प्रक्रिया लांबणीवर पडली. एप्रिल महिन्यात निवडणूक न झाल्याने आता ती निवडणूक नेमकी कधी घेणार, याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. मात्र, आॅक्टोबर महिन्यात निवडणूक आयोगाने अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रभागरचनेतील एका प्रभागाच्या हरकतीवर निर्णय दिला आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक २२ मध्ये काही प्रमाणात बदल होणार आहेत.
या प्रभागात बदल झाल्याने त्याचा परिणाम परिसरातील इतर प्रभागांच्या रचनेवरही निश्चित पडणार आहे.
प्रभागांच्या सीमेत होणार बदल
प्रभाग २२ हा हाउसिंग बोर्ड परिसरातील असून त्यातील काही चाळी या नकाशात त्याच प्रभागात दाखविण्यात आल्या होत्या. मात्र, रचनेमध्ये तो भाग शेजारील शिवनगर या प्रभागात टाकला होता.
तसेच शास्त्रीनगर भागातील काही भागही प्रभाग क्रमांक २२ ला जोडण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील दोन ते तीन प्रभागांच्या सीमेमध्ये बदल होणार आहे.
नकाशावर दाखविण्यात आलेला परिसर प्रभागरचनेला धरून होता. मात्र, प्रत्यक्षात ब्लॉक दुसऱ्या प्रभागाला जोडण्यात आला होता. त्यामुळे मी ती हरकत घेतली होती. त्या हरकतीवर मी माझे म्हणणेही मांडले होते. त्याच्यावर सकारात्मक निर्णय झाल्याचे समाधान आहे.
- किरण राठोड, रहिवासी