भिवंडीत आढळली प्लास्टिकची अंडी?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 01:15 AM2019-06-26T01:15:52+5:302019-06-26T01:16:18+5:30
भिवंडी तालुक्यातील सुरई येथील संतोष साळवी यांनी गावाजवळील माणकोली येथील कृष्णा सुपर मार्केट या दुकानातून ४० अंडी खरेदी केली.
भिवंडी : तालुक्यातील सुरई येथील संतोष साळवी यांनी गावाजवळील माणकोली येथील कृष्णा सुपर मार्केट या दुकानातून ४० अंडी खरेदी केली. त्यांची पत्नी मनीषा हिने त्या पैकी काही अंडी मुलांना खाण्यासाठी उकडली असता अंड्याच्या कवचाचे तुकडे निघत होते. तर त्यातील बलक खात असताना त्या अंड्याला नेहमीचा ओळखीचा वास येत नसल्याने त्यांना संशय आला. त्यांनी संतोष यांना अंड्याबाबत सांगितले असता काही अंड्यांचा आकार ओबडधोबड आढळला. काही अंडी फोडून पाहिली तर त्यामधील बलक वास विरहित आढळला. त्यामुळे त्यांनी ठाणे येथील अन्न व औषध विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधला.
अन्न व औषध निरीक्षक माणिक जाधव यांनी संतोष साळवी यांच्या घरी जाऊन त्यांच्याजवळील सहा अंडी परीक्षणासाठी ताब्यात घेतली असून त्याची चाचणी झाल्यावरच ही अंडी नक्की कसली आहेत ही बाब स्पष्ट होईल. दरम्यान, उन्हाळ्यात बऱ्याचदा अंडी खराब होत असल्याने तसा काही प्रकार आहे का? हेही तपासले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना राज्यात घडल्याने खळबळ उडाली होती. नेमका हा प्रकार कशामुळे घडला असावा याचा शोध सध्या घेतला जात आहे.