घरातून पळालेला मुलगा पालकांकडे , पोलिसांनी काढली समजूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:35 IST2017-10-29T00:35:37+5:302017-10-29T00:35:54+5:30
आई रागावली म्हणून १३ वर्षाच्या मुलाने घर सोडले. ते सोडल्यावर त्याने बदलापूर येथे राहणाºया आपल्या मावशीच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला.

घरातून पळालेला मुलगा पालकांकडे , पोलिसांनी काढली समजूत
बदलापूर : आई रागावली म्हणून १३ वर्षाच्या मुलाने घर सोडले. ते सोडल्यावर त्याने बदलापूर येथे राहणाºया आपल्या मावशीच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. पण बदलापूर स्थानकात आल्यावर त्याला घर न सापडल्याने तो स्थानक परिसरात रडत बसला होता. अखेर एका रिक्षाचालकाने त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीपकुमार राजभोज यांनी त्या मुलाच्या पालकांचा शोध घेऊन त्याला त्यांच्याकडे सुपूर्द केले.
परभणी येथील गणेशनगरमध्ये राहणारा इरफान शेख हा ८ वीमध्ये शिकतो. २६ आॅक्टोबरला आई त्याला रागावल्याने तो रागाच्या भरात घर सोडून निघून गेला. घर सोडल्यावर तो कोठे गेला याची माहिती त्याच्या आईला नव्हती. इरफान हा थेट परभणीहून मुंबईला आणि नंतर मुंबईहून बदलापूरमध्ये आला. बदलापूरमध्ये त्याची मावशी राहत असल्याने तो येथे आला. मात्र मावशीचे घर न सापडल्याने तो स्थानकात रडत बसला. ही बाब रिक्षाचालक मंगेश थोरात यांच्या लक्षात येताच त्यांनी लागलीच या मुलाला पोलीस ठाण्यात आणले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजभोज यांनी त्या मुलाची चौकशी केल्यावर तो मुलगा परभणीचा असल्याचे समोर आले.
आई रागावल्याने घर सोडल्याचे त्याने सांगितले. मात्र पुन्हा घरी जाणार नाही असा हट्ट त्याने केला. पोलिसांनी त्या मुलाची समजूत काढत त्याच्या पालकांचा शोध घेतला. पालक बदलापूरमध्ये येत नाही तोपर्यंत या मुलाची देखरेखही पोलिसांनीच केली. इरफानची आई पोलीस ठाण्यात आल्यावर तिच्याकडे मुलाला सुपूर्द केले. इरफानची समजूत काढल्याने त्याच्या आईने पोलिसांचे आभार मानले.