बॉईज क्रिकेट क्लबची एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब अ संघावर मात
By प्रज्ञा म्हात्रे | Published: May 6, 2024 05:31 PM2024-05-06T17:31:52+5:302024-05-06T17:32:56+5:30
बॉईज क्रिकेट क्लबने सहा चेंडूत १२ धावा करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : बॉईज क्रिकेट क्लबने सुपर ओव्हरमध्ये गतउपविजेत्या एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (अ) संघाला एका धावेने मत देत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित १२ व्या ठाणे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले. सामन्याच्या निर्धारित डावात उभय संघ १५९ धावांवर बरोबरीत राहिले. सुपर ओव्हरमध्ये एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब अ संघाने एका षटकात ११ धावा जमा केल्या. बॉईज क्रिकेट क्लबने सहा चेंडूत १२ धावा करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १५९ धावसंख्या उभारली. संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून देताना आदित्य रावतने ८१ आणि हर्षल जाधवने ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली. या डावात निपुण पांचाळने दोन, हर्षल सोनी, अथर्व अंकोलेकर आणि शशी कदमने प्रत्येकी एक बळी मिळवला. या धावसंख्येला उत्तर देताना एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब अ संघ ५ बाद १०१ असा अडचणीत आला होता. पण विद्याधर कामत आणि शशी कदमने सहाव्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी करत संघाला १५५ धावसंख्येवर पोहचवले, शशीने नाबाद ४६ आणि जसप्रीत रंधावाने ३० आणि विद्या कामतने २२ धावा केल्या. पण या दरम्यान विद्या कामत तंबूत परतल्याने शशीने हर्षल सोनीला हाताशी घेत एक धाव घेऊन सामन्यात बरोबरी साधली. बॉईज क्रिकेट क्लबच्या पियुष कनोजियाने दोन, सक्षम पराशर, पराग जाधव आणि हर्षल जाधवने प्रत्येकी एक बळी मिळवला. सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना अखिल हेरवाडकरने नाबाद २ आणि शशी कदमने नाबाद ९ धावा करत एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबला ११ धावा जमवून दिल्या, उत्तरादाखल हर्षल जाधवने ४ आणि आदित्य रावतने ८ धावा करत बॉईज क्रिकेट क्लबला उपांत्य फेरीत स्थान मिळवून दिले.
संक्षिप्त धावफलक : बॉईज क्रिकेट क्लब : २० षटकात ९ बाद १५९ (आदित्य रावत ८१, हर्षल जाधव ५१ , निपुण पांचाळ ४-२८-२, हर्षल सोनी ४-३४-१, अथर्व अंकोलेकर ४-२८-१, शशी कदम ४-२३-१ ) बरोबरीत एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (अ) : २० षटकात ७ बाद १५९ (शशी कदम नाबाद ४६जसप्रीत रंधावा ३९, विद्याधर कामत २२, पियुष कनोजिया ३-१६-२ , सक्षम पारकर ४-३७-१ पराग जाधव १-१४-१, हर्षल जाधव ४-३७-१)/
सुपर ओव्हर : एलमठ शिंदे क्रिकेट क्लब (अ संघ) : १ षटकात बिनबाद ११ ( अखिल हेरवाडकर नाबाद २ , शशी कदम नाबाद ९, अजय मिश्रा १-०-०-११ ) पराभूत विरुद्ध बॉईज क्रिकेट क्लब : १ षटकांत बिनबाद १२ (हर्षल जाधव नाबाद ४, आदित्य राव नाबाद ८, अथर्व अंकोलेकर १-०-०-१२ )