पाककृतींचे पुस्तक प्रथमच ब्रेल लिपीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:26 AM2019-02-27T00:26:09+5:302019-02-27T00:26:19+5:30
दृष्टिहिनांसाठी ठरणार उपयुक्त : डोंबिवलीच्या ऐश्वर्या पुणेकर यांचा उपक्रम
- जान्हवी मोर्ये
डोंबिवली : बाजारात अनेक पाककलेची पुस्तके उपलब्ध आहेत; मात्र दृष्टिहीन व्यक्तींसाठी उपयुक्त ठरणारे ब्रेल लिपीतील पुस्तक अद्याप उपलब्ध नव्हते. डोंबिवलीतील पाककलातज्ज्ञ ऐश्वर्या पुणेकर यांनी ‘रुचीपालट’ हे ब्रेल लिपीतील पहिले पाककलेचे पुस्तक आणल्याने अंध व्यक्तींनाही आता नवनवीन पदार्थ शिकता येणार आहेत. या पुस्तकाचे त्या मोफत वाटप करत आहेत.
गोग्रासवाडी येथे राहणाऱ्या ऐश्वर्या नऊ वर्षांपासून मुलींना पाककलेचे धडे देत आहेत. ‘रुचीपालट’ या पुस्तकाचे बे्रलमुद्रक एनएफबीएम ब्रेल पब्लिकेशन सेंटर यांच्यातर्फे जागृती या मुलींच्या शाळेत प्रकाशन झाले. आळंदी येथे या पुस्तकाचे प्रिंटिंग झाले असून ऐश्वर्या यांनी स्वखर्चाने हे पुस्तक काढले आहे. त्यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला ठाण्याच्या ‘नॅब’ संस्थेच्या सुखदा पंत आल्या होत्या. त्यांच्याकडून याची प्रेरणा ऐश्वर्या यांना मिळाली. पुस्तकामध्ये ७० रेसिपींचा समावेश आहे. यामध्ये सूप, चायनीज, पंजाबी पदार्थ, भाताचे विविध प्रकार, डोसा, पराठे, सॅण्डविच, ढोकळ्याचे प्रकार, उपवासाचे पदार्थ, कुकीज, स्टार्टर, केक , आइस्क्रीम, डेझर्ट, मॉक्टेल अशा विविध प्रकारचा समावेश आहे. हे पुस्तक तयार करण्यासाठी पाच ते सहा महिने लागल्याचे ऐश्वर्या यांनी सांगितले.
ऐश्वर्या यांनी प्रथम सर्व रेसिपी मराठीत लिहिल्या. त्या ‘प्रज्ञा चिकाक्षू’या सॉफ्टवेअरमध्ये टाक ल्या. त्यानंतर, हे पुस्तक तयार झाले. मराठीत एखादा शब्द चार अंकी असेल, तर ब्रेलमध्ये तो आठ अंकी होतो. त्यामुळे हे टाइप करायला जास्त कालावधी लागला. या पुस्तकाच्या सध्या ५० प्रती काढल्या आहेत. त्यातील सहा प्रती अंध मुलींना दिल्या.
अंधांच्या संस्थेला पुस्तक दिले भेट
डोंबिवलीतील ब्लाइंड प्रोग्रेसिव्ह वेल्फेअर फाउंडेशनचे अनिल दिवटे यांना ऐश्वर्या यांनी पुस्तकाचा संच शुक्रवारी भेट दिला. दिवटे हे जन्मापासून दृष्टिहीन असून ३० वर्षे ते अंधांसाठी काम करत आहेत. दिवटे यांनी पुस्तकाची चार पाने वाचून आनंद व्यक्त केला. यावेळी मीना गोडखिंडी, अद्वैत पुणेकर व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. ऐश्वर्या यांनी अंधांसाठी डोळस असे कार्य केले असून सर्व प्रकारच्या पाककृतींचा समावेश असलेले दुसरे पुस्तक काढण्याचा त्यांनी मानस व्यक्त केला आहे.