मुलांचे ब्रेन वॉश करून धर्मांतर?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 09:18 AM2023-06-07T09:18:28+5:302023-06-07T09:19:02+5:30
ऑनलाइन गेम ॲपच्या आड लहान मुलांचे धर्मपरिवर्तन करण्यात येत असल्याची घटना उघडकीस आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंब्रा: ऑनलाइन गेम ॲपच्या आड लहान मुलांचे धर्मपरिवर्तन करण्यात येत असल्याची घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील कवीनगर पोलिसांनी या प्रकरणात अटक केलेल्या अब्दुल रहमान ऊर्फ नन्नी याने दिलेल्या कबुलीजवाबानंतर त्याचा साथीदार असलेल्या अन्य एका आरोपीच्या शोधासाठी गाझियाबाद पोलिस मुंब्र्यात आले आहेत. ते स्थानिक पोलिसांची मदत घेत आहेत.
अटक केलेल्या आरोपीने दिलेल्या माहितीनुसार तो आणि मुंब्र्यातील रशीद कंपाउंड भागातील देवरी पाड्यातील शाजिय अपार्टमेंट या इमारतीत राहणारा शहानवाज खान हा भाऊ आणि आईसह सहा दिवसांपूर्वी पसार झाला आहे. शहानवाज आणि नन्नी हे बनावट आयडी बनवून लहान मुलांना ऑनलाइन गेम खेळण्यास प्राेत्साहित करून गेम हारणाऱ्यांना जिंकण्यासाठी धर्मगुरूचे व्हिडीओ दाखवून, तसेच कलमा पडल्यास जिंकणार असे प्रलोभन दाखवून त्यांचे धर्मांतर करत होते. स्थानिक पोलिसांच्या मदतीने उत्तर प्रदेशातील पोलिस शहानवाज याचा दोन दिवस शोध घेत होते. त्यांना तो आढळला नाही, असे मुंब्रा पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी सांगितले.